महाराष्ट्र V/S त्रिपुरा रणजी सामना: तिसऱ्या दिवशी महाराष्ट्र सर्वबाद ४१८; त्रिपुराच्या दुसऱ्या डावात २ बाद १३५ धावा; महाराष्ट्रकडे १३ धावांची आघाडी
कन्या न्यूज नेटवर्क ||
सोलापूर : इंदिरा गांधी पार्क स्टेडियमवर सुरू असलेल्या शेवटच्या रणजी सामन्यात तिसऱ्या दिवशी खेळ थांबला तेव्हा त्रिपुरा संघाने दुसऱ्या डावात २बाद १३५ धावा केल्या आहेत. महाराष्ट्राने पहिल्या डावात सर्वबाद ४१८ धावा केल्याने अद्यापही त्यांच्याकडे १३ धावांची आघाडी आहे.
कालच्या २३५ धावसंख्येवरून महाराष्ट्राने आपला पहिला डाव पुढे सुरू केला. थोड्याच वेळात सिद्धेश वीरने दमदार शतक झळकाविले (२३७ चेंडूत १०० धावा. १३ चौकारासह स्पर्धेतील दुसरे शतक). परंतु, उसळी घेणाऱ्या एका चेंडूवर फटका मारण्याच्या नादात कर्णधार अंकित बावणे ४८ धावा काढून एम.बी.मुरा सिंगकडून झेलबाद झाला. नंतर आलेल्या (मागील सामन्यातील शतकवीर) सौरभ नवलेसोबत ४८ धावांची भागीदारी केल्यावर सिद्धेश (१३१ धावा) मनदीप सिंगकडून त्रिफळाचित झाला.
जेवणाच्या मध्यंतराला खेळ थांबला तेव्हा महाराष्ट्राने ५ बाद ३६५ (१०७ षटके) अशी ९५ धावांची आघाडी घेतली होती. त्यानंतर पुढील सत्रात स्फोटक फलंदाज रामकृष्ण घोषसोबत फटकेबाजी करत सौरभ नवलेने अर्धशतक झळकाविले. दोघांची ६२ धावांची भागीदारी झाली होती, तेव्हा अजय सरकारने सौरभ नवले (६८) याला यष्टिरक्षकाकडे झेल द्यायला भाग पाडले. पुढे गुर्बानीसोबत खेळताना घोष (२०) अजय सरकारकडून बाद झाला. पुढील २८ धावामध्ये गुर्बानी (११) धावबाद, प्रदीप दधे (७), हितेश वाळुंज (१५) हे एम.बी. मुरा सिंगकडून बाद झाले. महाराष्ट्राचा पहिला डाव ४१६ धावांवर (१२४.१ षटके) थांबला आणि त्याचवेळी पंचांनी चहापानची वेळ घोषित केली.
त्रिपुराकडून एम.बी.मुरा सिंग ३१ धावात ४ बळी, अजय सरकार ७७ धावात तीन बळी व संकर पॉल, मनदीप सिंग यांनी प्रत्येकी एकेक बळी मिळविला.
त्रिपुराच्या दुसऱ्या डावाची सुरूवात खराब झाली. महाराष्ट्राच्या जलद गती गोलंदाज रामकृष्ण घोष व प्रदीप दधे यांनीलागोपाठच्या षटकात सलामीवीर बिक्रम कुमार दास (५), तेजस्वी जयस्वाल (५) यांना माघारी धाडले. परंतु, त्यानंतर आलेल्या श्रीदाम पॉलने पदार्पण करणाऱ्या रियाझ (जखमी होताना ३०) आणि संकर पॉल (नाबाद ६) सोबत तिसऱ्या गड्यासाठी ११८ धावांची भागीदारी रचली. तिसऱ्या दिवशीच्याअखेर खेळ थांबला तेव्हा त्रिपुराने ३० षटकात २ बाद १३५ धावा केल्या आहेत. त्यापूर्वी श्रीदाम पॉलने धमाकेदार अर्धशतक साजरे करत ५ चौकार, ५ षटकार मारत ७८ चेंडूमध्ये ७७ धावा काढून नाबाद राहिला आहे.
उद्या सामन्याचा शेवटचा चौथा दिवस आहे. त्रिपुराचा दुसरा डाव लवकरात लवकर गुंडाळून महाराष्ट्र किती गडी राखून मिळालेले लक्ष साध्य करते हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.सोलापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्यावतीने या सामन्याचे उत्कृष्ट आयोजन होत आहे. आज संघटनेचे व्हाईस चेअरमन श्रीकांत मोरे, ज्येष्ठ विधीज्ञ धनंजय माने यांच्यासह असंख्य प्रेक्षक स्टेडियमवर उपस्थित होते.