सोलापूर मीडिया कप: २०२५’  क्रिकेट स्पर्धा; सावा संघाला उपविजेतेपद, स्वप्निल म्हेत्रसकर मालिकावीर

कन्या न्यूज नेटवर्क ||

सोलापूर : सोलापूर श्रमिक पत्रकार संघ आणि सोलापूर ॲडव्हर्टायझिंग एजन्सीज वेल्फेअर असोसिएशन (सावा) यांच्यावतीने आयोजित ‘सोलापूर मीडिया कप: २०२५’  क्रिकेट स्पर्धेच्या  अंतिम सामन्यात डिजिटल मीडिया संघाने सावा संघाला मोठ्या फरकाने पराभूत करत स्पर्धेचे विजेतेपद पटकाविले. सावा संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर क्रीडा संकुल (रेल्वे मैदान) येथे आयोजित या स्पर्धेत लोकमत, दिव्य मराठी, सकाळ, संचार, तरुण भारत संवाद, श्रमिक पत्रकार संघ, डिजिटल मीडिया, सावा, मेट्रो सोलापूर आणि फोटो-व्हिडिओग्राफर या दहा संघांचा यात समावेश होता.

अंतिम सामना रविवारी सायंकाळी डिजिटल मीडिया विरूद्ध सावा या संघात झाला. प्रथम फलंदाजी करताना सावा संघाने निर्धारित ६ षटकात ६ बाद १८ धावा केल्या. प्रत्युत्तरात डिजिटल मीडिया संघाने हे आव्हान अवघ्या १.१ षटकात २१ धावा करत पूर्ण करीत दहा गडी राखून एकतर्फी दणदणीत विजय मिळविला. धनंजय जाधव हा सामनावीर ठरला.

  • स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज व मालिकावीरचा किताब स्वप्निल म्हेत्रसकर (सावा) यांनी पटकाविला.
  • उत्कृष्ट गोलंदाज म्हणून  इब्राहिम मुजावर (डिजिटल मीडिया) व उत्कृष्ट  क्षेत्ररक्षक म्हणून सुभाष कलशेट्टी (श्रमिक पत्रकार संघ) यांना गौरविण्यात आले.
  • अंतिम सामना एकतर्फी झाला असला तरी स्पर्धेचे उपांत्य फेरीचे सामने मात्र उच्चांकी धावसंख्येचे आणि चुरशीचे झाले होते.
  • चारही संघांच्या फलंदाजांनी अक्षरश: षटकार व चौकारांची आतिषबाजी करत प्रेक्षकांना खिळवून ठेवले होते.

सोलापूरचा सुपूत्र तथा आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू अर्शिन कुलकर्णी याच्या हस्ते या क्रिकेट स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यात आले. यावेळी डिजिटल मीडिया संघाचे अध्यक्ष विजयकुमार बाबर, कॅप्टन रत्नदीप सोनवणे आणि टीमने बक्षीस स्वीकारले. यावेळी शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख अमोल शिंदे, माजी नगरसेवक अनंत जाधव, बँक ऑफ इंडियाचे वरिष्ठ अधिकारी विजयकुमार सोनकुसरे, श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे, सरचिटणीस सागर सुरवसे, खजिनदार किरण बनसोडे, ‘सावा’चे अध्यक्ष संतोष उदगिरी, सचिव अक्षय जव्हेरी, राज्य अधिस्वीकृती समितीचे सदस्य प्रमोद बोडके, संयोजन सदस्य आफताब शेख आदींची प्रमुख उपस्थिती होती.

क्रिकेट नियमित खेळले पाहिजे : अर्शिन कुलकर्णी

क्रिकेट हा सांघिक खेळ आहे. तो सर्वांनाच आनंद देतो. अलिकडच्या काळात क्रिकेटची मोठी क्रेझ निर्माण झाली आहे. स्पर्धेपुरते न खेळता क्रिकेट नियमित खेळले पाहिजे, असे सांगून अर्शिन कुलकर्णीने विजेत्यांना व स्पर्धेत सहभागी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

× Contact