“दिव्यांग प्रमाणपत्र शिबिरात  दिव्यांगांना  

कोणतीही अडचण येता कामा नये”

 By Kanya News||    

सोलापूर : जिल्ह्यात दिव्यांग व्यक्ती अस्मिता अभियान अंतर्गत तपासणी व निधन विशेष मोहीम कार्यक्रम दि. १९ ऑगस्ट २०२४ ते  दि. २३ सप्टेंबर २०२४ या कालावधीत राबविण्यात येत आहे. या अंतर्गत प्रत्येक तालुक्यात दोन दिवस याप्रमाणे २२ शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे. या शिबिरातून १५ हजार ६६६ दिव्यांग लाभार्थ्यांना दिव्यांगात्वाची तपासणी करून प्रमाणपत्र देण्याचे नियोजन आहे. तरी सर्व संबंधित शासकीय यंत्रणा व स्वयंसेवी संस्थांनी या शिबिराच्या ठिकाणी दिव्यांग व्यक्तींची कोणत्याही प्रकारची अडचण होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित दिव्यांग व्यक्ती अस्मिता अभियान शिबिरांची पूर्वतयारी आढावा बैठकीत जिल्हाधिकारी आशीर्वाद मार्गदर्शन करत होते. यावेळी मित्राचे संचालक अभिजीत राऊत, जिल्हा परिषदेचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी प्रसाद मिरकले, जिल्हा कुष्ठरोग अधिकारी डॉ. मोहन शेगर, प्राथमिक शिक्षण विभागाचे जिल्हा समन्वयक परमेश्वर कमाजी जिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. तोडकर, अक्कलकोट पंचायत समितीचे सहाय्यक गटविकास अधिकारी ए आर. दोडमनी, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अस्थिरोग तज्ञ डॉ. एस. ए. टेंगले यांच्यासह आरोग्य विभाग व स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद म्हणाले,  या शिबिराच्या माध्यमातून जिल्ह्यातील एकही दिव्यांग लाभार्थी प्रमाणपत्रापासून वंचित राहणार नाही यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी प्रयत्न करावेत. या शिबिरात सर्व यंत्रणांनी अत्यंत सकारात्मकता ठेवून काम करणे अपेक्षित आहे. सर्व डॉक्टर्सनी ही चाकोरी बाहेर जाऊन काम करावे. या शिबिरासाठी आवश्यक असलेले सर्व साहित्य व सर्व सोयी सुविधांसाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून आवश्यक तेवढा निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने शिबिराच्या ठिकाणी दिव्यांग लाभार्थ्यांची ने – आण करणे व त्या ठिकाणी त्यांना अन्य सुविधा पुरवण्यासाठी कोणत्याही प्रकारची कुचराई होणार नाही, याची दक्षता सर्व संबंधित शासकीय यंत्रणांनी घ्यावी, असे निर्देशही यावेळी त्यांनी दिले.

मित्राचे संचालक अभिजीत राऊत म्हणाले, जिल्ह्यातील ११ तालुक्यात प्रत्येकी दोन याप्रमाणे एकूण २२ शिबिराचे आयोजन करण्यात येत असून, यासाठी १५ हजार ६६ दिव्यांग लाभार्थ्यांनी नोंदणी केलेली आहे. जिल्ह्यातील दिव्यांगांची संख्या १ लाख १५ हजार ७५५ इतकी असून यातील ६८ टक्के ग्रामीण भागातील तर शहरी भागातील ३२ टक्के दिव्यांग संख्या आहे. आशाताई आणि यंत्रणेतील तालुका स्तरावरील संबंधित घटकांसाठी २७ कार्यशाळा घेण्यात आले असून, त्यातून ३७४२  प्रशिक्षणार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात आल्याची माहिती मित्राचे संचालक अभिजीत राऊत यांनी दिली.या अभियानात आरोग्य यंत्रणा, गटविकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, समाज कल्याणचे अधिकारी, स्वयंसेवी संस्था व मिशन इन्स्टिट्यूट फॉर ट्रेनिंग रिसर्च अँड ॲक्शन(मित्रा) यंत्रणेवर जबाबदारी असून हे शिबिर यशस्वी करण्यासाठी सर्व यंत्रणांनी परस्परात समन्वय ठेवून सहकार्य करण्याची अपेक्षा शराऊत यांनी व्यक्त केली.

=======================================

दिव्यांगत्व प्रमाणपत्र  शिबिराचे वेळापत्रक-

 जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींना दिव्यांगत्व प्रमाणपत्र आणि वैश्विक ओळखपत्र देण्यासाठी दिव्यांगत्व प्रमाणपत्र तपासणी आणि निदान विशेष मोहिम कार्यक्रम शिबीर वेळापत्रक तालुका, लाभार्थी संख्या, शिबीर स्थळ, दिनांक, वार व वेळ निहाय पुढीलप्रमाणे –

  • पंढरपूर – १३४२, ग्रामीण रुग्णालय, पंढरपूर, दि. १९ व २० ऑगस्ट २०२४, सोमवार व मंगळवारी सकाळी ९ ते दुपारी ३ वाजता. 
  • अक्कलकोट – १५३२, ग्रामीण रुग्णालय, अक्कलकोट, दि. २२ व २३ ऑगस्ट २०२४, गुरुवार व शुक्रवारी सकाळी ९ ते दुपारी ३ वाजता. 
  • बार्शी  – १३५७, ग्रामीण रुग्णालय, बार्शी, दि. २६ व २७ ऑगस्ट २०२४, सोमवार व मंगळवारी सकाळी ९ ते दुपारी ३ वाजता. 
  • माळशिरस  – १७२०, ग्रामीण रुग्णालय, माळशिरस, दि. २९ व ३० ऑगस्ट २०२४, गुरुवार व शुक्रवारी सकाळी ९ ते दुपारी ३ वाजता. 
  • सांगोला  – १८०३, ग्रामीण रुग्णालय, सांगोला, दि. २ व ३ सप्टेंबर २०२४, सोमवार व मंगळवारी सकाळी ९ ते दुपारी ३ वाजता. 
  • करमाळा – १६२९, ग्रामीण रुग्णालय, करमाळा, दि. ५ व ६ सप्टेंबर २०२४, गुरुवार व शुक्रवारी सकाळी ९ ते दुपारी ३ वाजता. 
  • मोहोळ – १८४१, ग्रामीण रुग्णालय, मोहोळ, दि. ९, १० व १२ सप्टेंबर २०२४, सोमवार, मंगळवार  व गुरुवारी सकाळी ९ ते दुपारी ३ वाजता. 
  • माढा – १२९२, ग्रामीण रुग्णालय, कुर्डूवाडी, दि. १३ व १४  सप्टेंबर २०२४, शुक्रवार व शनिवारी सकाळी ९ ते दुपारी ३ वाजता. 
  • मंगळवेढा – ८०८, ग्रामीण रुग्णालय, मंगळवेढा, दि. १७ व १९ सप्टेंबर २०२४, मंगळवार व गुरुवार सकाळी ९ ते दुपारी ३ वाजता. 
  • सोलापूर दक्षिण – १२९२, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, सोलापूर, दि. २० व २१ सप्टेंबर २०२४, शुक्रवार व शनिवारी सकाळी ९ ते दुपारी ३ वाजता. 
  • सोलापूर उत्तर – ५६१, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, सोलापूर, दि. २३ सप्टेंबर २०२४, सोमवारी सकाळी ९ ते दुपारी ३ वाजता.  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

× Contact