अचानक तब्येत बिघडली; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सोलापूर दौरा झाला रद्द
कन्या न्यूज नेटवर्क ||
सोलापूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तब्येत अचानक बिघडल्याने त्यांचा मंगळवार, दि. ८ ऑगस्ट २०२४ रोजीचा सोलापूर दौरा कार्यक्रम रद्द झाला आहे. तसेच मुख्यमंत्र्यांचे आजचे सर्व शासकीय कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.
सोलापुरात मंगळवारी होम मैदान येथे होणाऱ्या महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा प्रचार व प्रसार कार्यक्रमास मुख्यमंत्री उपस्थित राहणार होते. मात्र मंगळवारी अचानक त्यांची तब्येत बिघडली. त्यामुळे त्यांचे पुढील सर्व कार्यक्रमदेखील रद्द करण्यात आहे. सोलापुरात होणारा मंगळवारचा महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या वचनपूर्ती कार्यक्रमासह मुंबईतील राज्य मंत्रिमंडळाची बैठकही रद्द करण्यात आली.तसेच महात्मा फुले ननाविनीकरण ऊर्जा व प्रोद्योगिकी मर्यादित (महाप्रीत) संचालक मंडळाची बैठक,सांयकाळी ७.३० वाजता होणारी मालदीवचे राष्ट्रपती मोहम्मद मुईझु व शिष्टमंडळ यांच्यासमवेत मुंबईतील राजभवन येथील द्विपक्षीय बैठक, त्यांच्या स्वागतार्थ आयोजित स्नेह भोजन समारंभ, रात्री ८.३० वाजता नियोजित कुर्ला विधानसभा क्षेत्रातील विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा हे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत, असे सोलापूर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मनीष काळजे यांनी सांगितले.