प्रशासकीय इमारत परिसरात दि. ११ जानेवारी रोजी स्वच्छता मोहीम
कन्या न्यूज नेटवर्क ||
सोलापूर : प्रशासकीय इमारत परिसरात दि. ११ जानेवारी रोजी स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे. या स्वच्छता मोहिमेत या इमारतीमधील १४ शासकीय कार्यालयातील जवळपास २५ अधिकारी आणि १६० कर्मचारी सहभागी होणार आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दि. ७ जानेवारी २०२५ रोजी राज्यातील सर्व अधिकारी यांना शंभर दिवस उद्दिष्ट प्रति बाबत सात कलमी कार्यक्रम देण्यात आलेला आहे. त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासकीय इमारतीमधील विविध विभागाच्या अधिकाऱ्यांनी एकत्रित येऊन आपले कार्यालय व आपला कार्यालय परिसर स्वच्छ ठेवण्याच्या अनुषंगाने बैठक घेतली.
ही बैठक जिल्हा माहिती अधिकारी कार्यालय येथे सर्व विभाग प्रमुखांची नियोजन बैठक उपजिल्हाधिकारी तथा भूसंपादन अधिकारी संतोषकुमार देशमुख, अन्नधान्य वितरण अधिकारी ओंकार पडोळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
या स्वच्छता नियोजन बैठकीस जिल्हा उपनिबंधक किरण गायकवाड, जिल्हा माहिती अधिकारी सुनील सोनटक्के, जिल्हा ग्राहक मंच न्यायालयाचे प्रबंधक प्रशांत तावडे, उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या सहसंचालक नलिनी टेंभेकर, नगर भूमापन संचालक गजानन पोळ, भूजलचे वरिष्ठ भूवैज्ञानिक डॉक्टर मुस्ताक शेख, अन्न औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त एस. डी. जिंतूरकर, कृषी विभागाचे तंत्र अधिकारी एस. बी. देशमुख, भूसंपादन क्रमांक-११ चे सहाय्यक महसूल अधिकारी बी. व्ही. वाघ, नेहरू युवा केंद्राचे सुभाष चव्हाण, मत्स्य व्यवसाय विभागाचे राजेश पाटील, उपविभागीय अधिकारी सोलापूर ग्रामीण पोलीस निरीक्षक जी. ए. बिराजदार, बांधकाम विभागाचे सहाय्यक अभियंता विशाल लेंगरे आदी उपस्थित होते.
- उपजिल्हाधिकारी देशमुख म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शंभर दिवस उद्दिष्ट पूर्तीच्या अनुषंगाने राज्यातील सर्व अधिकारी यांना शंभर दिवस उद्दिष्टपुर्तीबाबत सात कलमी कार्यक्रम देण्यात आलेला आहे.
- याअंतर्गत विभाग कार्यालयाचे वेबसाईट अद्यावत करणे, इज ऑफ लिविंग संकल्पना काम करणे, शासकीय कार्यालय स्वच्छता मोहीम राबवणे, नागरिकांच्या तक्रारी प्रलंबित प्रकरणी निकाली काढणे, उद्योजकांना त्रास होणार नाही, याची काळजी घेणे, शासनाच्या महत्त्वाच्या प्रकल्पांना भेटी देणे शासकीय कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना सोयी सुविधा उपलब्ध करून देणे हा सात कलमी कार्यक्रम राज्यातील सर्व अधिकारी यांना देण्यात आलेला आहे.
- या पार्श्वभूमीवर या प्रशासकीय इमारतीमधील सर्व शासकीय विभाग प्रमुख अधिकारी कर्मचारी यांनी एकत्रित येऊन या इमारत परिसरात स्वच्छता मोहीम राबवण्याचा निर्णय घेतला आहे.
- त्याअनुषंगाने दि. ११ जानेवारी २०२५ रोजी सकाळी आठ ते दहा या कालावधीत विशेष स्वच्छता मोहीम राबवली जाणार असून, सर्व अधिकारी कर्मचारी यांनी या मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले.
या प्रशासकीय इमारतीमध्ये व परिसरात उच्च व तंत्र शिक्षण विभाग जिल्हा माहिती कार्यालय सोलापूर ग्रामीण उपविभागीय अधिकारी कार्यालय नगर भूमापन विभाग अन्न औषध प्रशासन नागरी समूह अन्नधान्य वितरण अधिकारी कृषी विभाग मत्स्य व्यवसाय वरिष्ठ भूवैज्ञानिक जिल्हा उपनिबंधक प्रकल्प संचालक निर्वाह केंद्र हे विभाग कार्यरत आहेत. या सर्व कार्यालया अंतर्गत जवळपास २५ अधिकारी व १६० कर्मचारी कामकाज करत आहे. परंतु या इमारत परिसरात खूप अस्वच्छता निर्माण झालेली आहे. इमारतीमध्ये अस्वच्छता सर्वत्र पसरलेली आहे त्या अनुषंगाने सर्व कार्यालय प्रमुखांनी एकत्रित येऊन सर्वप्रथम आपापले कार्यालय स्वच्छ करण्याची मोहीम हाती घेण्यात येणार आहे.
या स्वच्छता मोहिमेचा शुभारंभ दि. ११ जानेवारी २०२५ रोजी सकाळी आठ ते दहा या वेळेत प्रशासकीय इमारत परिसर मोहिमेची स्वच्छता करून करण्यात येणार आहे. या मोहिमेत सर्व अधिकारी कर्मचारी १०० टक्के उपस्थित राहणार आहेत. यापुढील काळात प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या शनिवारी व चौथ्या शनिवारी परिसर स्वच्छता मोहीम राबविण्याबाबत सर्वांचे एकमत झालेले आहे. परिसर स्वच्छ केल्यानंतर आपापल्या कार्यालयात प्रत्येक विभाग प्रमुखांनी त्यांची कार्यालये स्वच्छ व नीटनेटकी करून घेण्याचे ठरले. कार्यालयाबाहेर व्यवस्थित स्वच्छता ठेवून कार्यालयात येणाऱ्या नागरिकांसाठी बसण्यासाठी बैठक व्यवस्था करण्यात येणार आहे. आलेल्या नागरिकांची कामे वेळेत व गतीने होतील, यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.