श्री श्री श्री सद्गुरु बसवारूढ महास्वामीजी मठ ट्रस्टचा उपक्रम ;

दररोजच्या कुंकूमार्चनात महिला भाविकांनी सहभागी होण्याचे आवाहन

कन्या न्यूज नेटवर्क ||

सोलापूर : ॐ नमस्ते रुद्र मन्यव उतो त इषवे नमः। नमस्ते अस्तु धन्वने बाहुभ्यामुत ते नमः ll असा मंत्रघोष करीत ब्रह्मवृंदांच्या वेदघोषात अतिरुद्र स्वाहाकारास सोमवारी (दि. २६ ऑगस्ट) विमानतळापाठीमागे असलेल्या कस्तुरबा नगरातील श्री श्री श्री सद्गुरु बसवारूढ महास्वामीजी मठात प्रारंभ झाला. पहिल्या दिवशी भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती.

सोमवारी सकाळी गोपूजन, ध्वजपूजन, मंगलमंत्र पठण, महागणपती पूजन, स्वस्तिपुण्याहवाचन, मातृका पूजन, नांदी श्राद्ध, ऋत्विग् वरण, प्रधान देवता स्थापन, अग्निमंथन, अग्निस्थापना, कुंड संस्कार, नवग्रह होमम् हे विधी करण्यात आले. यानंतर अतिरुद्र स्वाहाकारास आरंभ झाला.

श्री श्री श्री सद्गुरु बसवारूढ महास्वामीजी मठाचे संस्थापक श्री. ब्र. श्री. ईश्वरानंद महास्वामीजी यांच्या प्रमुख उपस्थितीत मठाधिपती श्री. ब्र. श्री. शिवपुत्र महास्वामीजी यांच्यासह मुख्य यजमान ब्रिजमोहन फोफलिया, यजमान माजी महापौर किशोर देशपांडे, स्वागत समिती उपाध्यक्ष सोमनाथ वैद्य, मठाचे विश्वस्त उद्योजक सतीश कुलकर्णी, सुधीर इनामदार यांनी सहकुटुंब अतिरुद्र स्वाहाकार केला.

 

भगवान श्री शंकर आणि श्री पार्वती देवीची मांडलेली पूजा, रुद्राची एकामागून एक होणारी आवर्तने, महिला भाविकांच्या हस्ते कुंकुमार्चन आणि दर्शनासाठी आलेल्या भाविकांची गर्दी, यामुळे वातावरण भक्तीमय बनले होते. सायंकाळी शिवपुराण, प्रवचन, अष्टावधान सेवा, मंत्रपुष्प, महामंगलारती करण्यात आली.

मंगळवारपासून रविवारपर्यंत दररोज सकाळी ७ ते दुपारी २ वाजेपर्यंत अतिरुद्र स्वाहाकार, सकाळी १० ते १२ कुंकूमार्चन तर दुपारी १२ वाजता दररोज भाविकांना महाप्रसादाचे वितरण करण्यात येणार आहे. भाविकांनी दररोज या कार्यक्रमासाठी उपस्थित रहावे, असे आवाहन श्री श्री श्री सद्गुरु बसवारूढ महास्वामीजी मठाचे संस्थापक श्री. ब्र. श्री. ईश्वरानंद महास्वामीजी यांनी याप्रसंगी केले.

=============================================================================

पिंपळ अन् शमीच्या लाकडापासून प्रज्वलित केला अग्नी

अतिरुद्र स्वाहाकारानिमित्त अग्निमंथन विधीद्वारे अग्निप्रज्वलित करण्यात आला. यावेळी अग्नी तयार करण्यासाठी काडेपेटीचा वापर न करता वेदकाळापासून चालत आलेल्या पिंपळ आणि शमीच्या लाकडापासून घुसळून अग्नी तयार करण्याच्या पद्धतीनुसार अग्नी प्रज्वलित करण्यात आला. हा विधी पाहण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

× Contact