सोलापूरच्या वैद्यकीय क्षेत्राच्या शिरपेचात मानाचा तुरा : हृदयविकारासंबंधी सोलापुरात एसीएस हॉस्पिटलमध्ये प्रथमच कार्यशाळा

कन्या न्यूज नेटवर्क||

 सोलापूर : महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यांसह कर्नाटकच्या उत्तरेकडील जिल्ह्यांत वैद्यकीय सेवेसाठी विश्वासार्ह आणि लोकप्रिय ठरलेल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये “एआय”चा वापर करून एकाच दिवशी हृदयरोगावरील तीन अतिजटील शस्त्रक्रिया सोमवारी करण्यात आल्या. भैय्या चौक येथे असलेल्या एसीएस हॉस्पिटलमध्ये आंतरराष्ट्रीय ख्यातीचे हृदयरोग तज्ञ डॉ. जसकरण सिंग दुग्गल यांच्या साथीने डॉ. प्रमोद पवार, डॉ. सिद्धांत गांधी यांनी या दुर्मिळ शस्त्रक्रिया करण्यात आल्याची माहिती डॉ. प्रमोद पवार आणि डॉ. सिद्धांत गांधी यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.

हृदयरोगावरील शस्त्रक्रियेत अत्यंत जटील आणि अवघड समजल्या जाणाऱ्या आयव्हस, रोटा अब्लेशन, बायफरगेशन एन्जोप्लास्टी, इंट्रावॅस्क्युलर लिथो ट्रिप्सी, अल्ट्रा लो कॉन्ट्रास आदी पद्धतींचा वापर करताना यात एआयचा वापर करून शस्त्रक्रियेचे निदान केल्यास त्यातील अचूकता वाढते, हे वैद्यकीय संशोधनातून सिद्ध झाले आहे. याबाबत माहिती देण्यासाठी एसीएस हॉस्पिटलमध्ये सोमवारी आयोजित कार्यशाळेत डॉ. जसकरण सिंग दुग्गल यांनी मार्गदर्शन केले. तीन शस्त्रक्रिया करण्यासाठी मोलाची साथही दिली.

पुणे येथील एका रुग्णाची एक वर्षभरापूर्वी बायपास शस्त्रक्रिया झाली होती. यानंतर पुढील सहा महिन्यातच त्यांची रक्तवाहिनी बंद पडली. अवघ्या तीन महिन्यांपूर्वी एन्जोप्लास्टीही करण्यात आली होती. मात्र तरीही त्या रुग्णाचा त्रास कमी न झाल्यामुळे रुग्ण सोलापुरातील एसीएस हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रियेसाठी दाखल झाला होता. या रुग्णावर तीन तास शस्त्रक्रिया करण्यात आली. सोलापूर आणि धाराशिवमधील प्रत्येकी एक रुग्णाच्याही शस्त्रक्रियेचे निदान एआयद्वारे करण्यात आले. या दोन्ही रुग्णांच्या हृदयाकडे जाणाऱ्या रक्तवाहिन्या ज्या ठिकाणी दुभागत होत्या. त्या ठिकाणी बायफरगेशन ही अत्याधुनिक पद्धती वापरून दोन्ही रक्तवाहिन्यातील रक्तपुरवठा सुरळीत करण्यात आला. या दोन्ही शस्त्रक्रिया प्रत्येकी दीड तास चालल्या. या तीनही रुग्णांच्या शस्त्रक्रियेसाठीचे निदान एआयच्या मदतीने करून डॉ. जसकरण सिंग दुग्गल यांच्या साथीने डॉ. प्रमोद पवार आणि डॉ. सिद्धांत गांधी यांनी या अतिशय जटील शस्त्रक्रिया केल्या. उपचारानंतर गुरुवारी या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला.

पुणे, धाराशिव आणि सोलापुरातील रुग्णांवर जटील शस्त्रक्रिया करण्यासाठी मोलाची साथ दिल्याबद्दल डॉ. जसकरण सिंग दुग्गल यांचा डॉ. प्रमोद पवार, डॉ. सिद्धांत गांधी, डॉ. राहुल कारीमुंगी, डॉ. दीपक गायकवाड यांनी सन्मान केला. ए आय चा वापर करून सोलापुरात करण्यात आलेल्या अतिजटील हृदय शस्त्रक्रियांमुळे सोलापूरच्या वैद्यकीय क्षेत्राच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. या पत्रकार परिषदेस डॉ. प्रमोद पवार, डॉ. सिद्धांत गांधी, डॉ. राहुल कारीमुंगी, डॉ. दीपक गायकवाड उपस्थित होते.

मुंबई आणि पुण्यातील रुग्णांचा सोलापूरवर वाढतोय विश्वास

सोलापुरातील वैद्यकीय सेवेचा दर्जा आणि विस्तार वाढत असल्यामुळे मुंबई, पुणे सारख्या मोठ्या शहरांतून सोलापुरात उपचारांसाठी येणाऱ्या रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. यातून मुंबई आणि पुण्यातील रुग्णांचा सोलापूरवर विश्वास वाढत असल्याचे दिसून येत आहे.

कोण आहेत डॉ. जसकरण सिंग दुग्गल ?

आंतरराष्ट्रीय ख्यातीचे हृदयरोग तज्ञ असलेले डॉ. जसकरण दुग्गल मुंबईस्थित जहांगीर हॉस्पिटलमध्ये वरिष्ठ हृदयरोग तज्ञ म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी अनेक दशके आर्मी हॉस्पिटलमध्ये सेवा दिली आहे.

चेन्नई आणि कोचिनमध्ये घेतले प्रशिक्षण

डॉ. प्रमोद पवार यांनी चेन्नई येथील मद्रास मेडिकल मिशन हॉस्पिटल तसेच कोची येथील लिसी हॉस्पिटलमध्ये रोटा अब्लेशन आणि आयव्हसचे तांत्रिक आणि शास्त्रीय प्रशिक्षण घेतले आहे. त्या ज्ञानाचा उपयोग डॉ. प्रमोद पवार रुग्णांसाठी करत आहेत.

एक वर्षभरापूर्वी पुण्यात माझी बायपास शस्त्रक्रिया झाली होती. त्यानंतर पुढील सहा महिन्यातच रक्तवाहिनी बंद पडली. तीन महिन्यापूर्वी एन्जोप्लास्टीची शस्त्रक्रियाही करण्यात आली. डॉ. प्रमोद पवार यांच्याबद्दल मला माहिती कळल्यामुळे मी सोलापुरात येऊन शस्त्रक्रिया करून घेणे पसंत केले. विशेष म्हणजे पुण्याच्या निम्या खर्चात माझी शस्त्रक्रिया झाली. आता माझी प्रकृती उत्तम आहे.

– अनिल चव्हाण, रुग्ण, पुणे

आंतरराष्ट्रीय दर्जाचे तंत्रज्ञान रुग्णांसाठी उपलब्ध

 वैद्यकीय क्षेत्रात येणारे आंतरराष्ट्रीय दर्जाचे अत्याधुनिक तंत्रज्ञान रुग्णांना उपलब्ध करून देण्याचा नेहमीच प्रयत्न असतो. त्यासाठी चेन्नई आणि कोची येथे याबाबतचे प्रशिक्षण घेतले आहे.

– डॉ. प्रमोद पवार, कार्डियोलॉजिस्ट, एसीएस हॉस्पिटल, सोलापूर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *