आतिश सिरसट  गेल्या आठ वर्षांपासून बेवारस मनोरुग्णांच्या सेवेसाठी कार्यरत

by assal solapuri||

सोलापूर : सोलापूर शहरातील  बेवारस मनोरुग्णांना वयोवृध्द लोकांना पोटभर जेवण मिळावे, या हेतूने संभव फाउंडेशनच्या माध्यमातून संभव अन्नपूर्णा योजनेला सुरुवात करण्यात आली आहे. नुकतेच संभव अन्नपूर्णा योजनेचे लोकार्पण करण्यात आले. संभव फाउंडेशनच्या माध्यमातून संस्थापक अध्यक्ष आतिश सिरसट हे गेल्या आठ वर्षांपासून बेवारस मनोरुग्णांसाठी कार्यरत आहेत. जागेअभावी मनोरुग्णांची सेवा ते स्मशान भूमीत करीत आहेत. त्यांना आंघोळ घालणे असो की त्यांची मलमपट्टी, दाढी, कटिंग, मलमुत्र अशा स्वच्छतेची कामे ते निस्वार्थ भावनेने गेली आठ वर्षांपासून करीत आहे. आतापर्यंत त्यांनी सोलापूर जिल्ह्यातून बेवारस व घरातून बाहेर पडून भटकणाऱ्या, भटकंती जीवन जगणाऱ्या २८८ हून अधिक मनोरुग्णांचे त्यांनी कौटुंबिक पुनर्वसन केले आहे.

त्यांनी आतापर्यंत कर्नाटक, बिहार, राजस्थान, छत्तीसगड, तामिळनाडू, गुजरात, दिल्ली आदी राज्यातील दुरावलेल्या मनोरुग्णांच्या कुटुंबांची भेट घडवून आणली आहे. आतिश सिरसट यांनी ८०० हून अधिक मनोरुग्णांची सेवा केली आहे. त्यांच्यावर उपचार, कपडे, दाढी केशकर्तन, त्यांच्या औषधोपचाराची व्यवस्था संभव फाउंडेशनच्या माध्यमातून केली जात आहे.  रस्त्यावर व चौकात बेवारसपणे फिरणाऱ्या  मनोरुग्णांना पोटभर जेवण मिळावे, या हेतूने संभव अन्नपूर्णा योजना सुरू करण्यात आली आहे. समाजातील उपेक्षित दुर्लक्षीत असणाऱ्या मनोरुग्णांना पुन्हा समाजाच्या प्रवाहात आणण्याचे कार्य व त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी संभव फाउंडेशनचे प्रयत्न आहेत.

या संभव अन्नपूर्णा योजनेचा लोकार्पण सोहळा इथॉस रियालिटी समुहाचे प्रमुख युवा उद्योजक तुकाराम गायकवाड यांच्या हस्ते झाले. यावेळी गटनेते, नगरसेवक आनंद (दादा) चंदनशिवे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी अंजलीताई वाघमारे, सुरेश पवार, शशिकांत टाकळीकर, राजू पुजारी, कादिर जमादार, संभव फाउंडेशनचे अध्यक्ष आतिश कविता लक्ष्मण सिरसट, अजय हिरेमठ, रोहन कामाने, मंगेश लामकाने आदींची उपस्थिती होती.

==============================================================================

रस्त्यावर बेवारस अवस्थेत खितपत पडलेल्या मनोरुग्णांसाठी हक्काचा निवारा मिळवून त्यांना नवं जीवन जगता यावं, यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. कुणीही भुकबळीचा शिकार होऊ नये, यासाठी समाजातील दानशूर व्यक्तींनी पुढे येऊन ही संभव अन्नपूर्णा योजना गरजूपर्यंत पोहोचवावी. अन्नपूर्णा योजनाचा गरजूंना लाभ मिळवून देण्यासाठी  (९७६५०६५०९८) या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन संभव फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष आतिश कविता लक्ष्मण सिरसट यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

× Contact