क्यू आर कोड स्कॅन करा आणि रेल्वे तिकीटाचे पेमेंट करा
by kanya news ||
सोलापूर : आता रेल्वे तिकीटाची पेमेंट करणे सोपे झाले असून, क्यू आर कोड स्कॅन करा आणि रेल्वे तिकीटाचे पेमेंट करू शकता. प्रवाश्यांना उत्तमोत्तम सेवा पुरविण्यासाठी रेल्वे प्रशासन नेहमीच सज्ज असते. नव्या तंत्रज्ञानाशी जुळते घेत सोलापूर रेल्वे विभागाने विभागीय व्यवस्थापक नीरज कुमार दोहरे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रथमच आता क्यू आर कोडची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. सध्या सर्वच जण पैशाच्या देवाण घेवाण करता यूपीआय सुविधेचा वापर करत आहेत. तीच बाब लक्षात घेऊन सोलापूर रेल्वे विभागाने तिकीट काउंटरवर आता यूपीआय क्यू आर कोड ची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
आगामी काळात संपूर्ण सोलापूर रेल्वे विभागामध्ये ८८ तिकीट काउंटरवर अश्या क्यू आर कोड सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. तरी रेल्वे प्रशासनाने उपलब्ध करून दिलेल्या या रेल्वे सुविधेचा लाभ प्रत्येक प्रवाश्यांनी करावा, असे आवाहन वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक श्री. योगेश पाटील यांनी केले आहे.
कोणताही प्रवासी जेव्हा रेल्वे स्थानकावर आरक्षित/अनारक्षित (जनरल) तिकीट काढण्यासाठी जाईल तेव्हा त्याच्या तिकिटाच्या रकमेचा क्यू आर कोड जेनरेट होईल आणि त्याने काढलेल्या तिकीटाची रक्कम त्याला आता एकच क्यू आर कोड स्कॅन करून पूर्ण करता येईल. पूर्वी पीओएस स्वॅप मशीन आणि कॅश अश्या दोन्ही स्वरूपात तिकिटाची रक्कम भरावी लागत होती त्यात प्रवाश्यांचा फार वेळ जात होता परंतु आता क्यू आर कोड स्कॅन मशीनमुळे प्रवाशांच्या वेळेची बचत होऊन त्यांना आपला प्रवास निश्चित करता येणार आहे.