घरच्या त्रासाला कंटाळून तिने केले पलायन; रेल्वे कर्मचार्यांचे सर्वत्र कौतुक
by kanya news ||
सोलापूर : घरच्यांशी झालेल्या विसंवादातून वाद विकोपाला गेला. दररोज आई-बाबांचे भांडण आणि तीची होणारी घुसमट तिला आता असह्य होत होती. आपण घरून निघून जाऊ, जेणेकरून आपल्या मनाला आणि शरीराला शांती मिळेल, या हेतूने तिने घरातून पलायन केले. मात्र रेल्वे कर्मचार्यांच्या सतर्कतेमुळे ती सापडली आणि तिला सुखरूपपणे तिच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आले.
सोलापूर रेल्वे स्थानकावर बागलकोट-यशवंतपूर एक्सप्रेस उभी होती. तिने कसलाही विचार न करता आपणाला फक्त आपल्या घरच्यांच्या त्रासापासून मुक्त व्हायचे हा सततचा विचार तिच्या डोक्यात होता. त्याच विचाराने ती ट्रेनमध्ये चढली. गाडी यशवंतपूरच्या दिशेने निघाली. ती विनातिकीट चढली खरी, पण कर्तव्यावर स्थित असणारे तिकीट निरीक्षक प्रशांत गाडे यांनी तिला तिकिटासंबंधी विचारले. तेंव्हा तिच्याकडे तिकीट नव्हते. दरम्यान, चौकशीत तिने तिची सर्व कौटुंबिक पार्श्वभूमी आणि घडलेला घटनाक्रम गाडे यांना सांगितला. गाडे यांनी तत्काळ संबंधित घटना नियंत्रण कक्षाला कळवली. नियंत्रण कक्षाने आरपीएफशी संपर्क साधला आणि कलबुर्गी रेल्वे स्थानकावर त्या मुलीला उतरवले. आरपीएफ आणि चाइल्ड केअर यांच्या मदतीने तिला तिच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात येत आहे.
कौटुंबिक क्लेश आणि घरात आपली वागणुकीचा एका नाबालिकांवर किती चुकीचा प्रभाव पडू शकतो, हेच या घटनेतून दिसून आले. यातून शिकण्यासारखेदेखील आहे. आरपीएफ कर्मचारी आणि तिकीट निरीक्षक प्रशांत गाडे यांच्या तत्परतेमुळे तिचे चुकीचे पलायन रोखले गेले. त्याबद्दल गाडे यांचे कौतुक होत आहे.