ओवाळणी थेट बँक खात्यावर जमा झाल्याने अनेक बहिणी भावुक,
ही योजना अशीच निरंतर सुरू ठेवण्याची मागणी
-
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना…. सोलापूर जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी
-
लाडकी बहीण योजनेतून महिलांची आर्थिक सक्षमीकरणाकडे वाटचाल
सोलापूर : “राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी व त्यांच्या आरोग्य व पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी पात्र महिलांसाठी “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना” ही महत्वकांक्षी योजना सुरू केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत दि. १७ ऑगस्ट २०२४ रोजी पुणे येथून या योजनेचा राज्यस्तरीय शुभारंभ झाला. सोलापूर जिल्ह्यात ही पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद व जिल्हा प्रशासन या योजनेची प्रचार व प्रसिद्धी अत्यंत नियोजनबद्धरित्या करून ही योजना तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवली. त्यामुळे जिल्ह्यात ६ लाख १४ हजार ७०० अर्ज प्राप्त झाले. त्यापैकी ५ लाख ९४ हजार ५८७ लाभार्थ्यांचे अर्ज मंजूर झाले आहेत. दि. १४ ऑगस्ट २०२४ पासून लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. योजनेचे पैसे थेट लाभार्थ्याच्या खात्यावर जमा झाल्याने त्यांच्या कुटुंबात आनंदाचे व उत्सहाचे वातावरण असून राखी पौर्णिमेची ओवाळणी राज्य शासनाकडून प्राप्त झाल्याची भावना अनेक बहिणींनी बोलून दाखवली.”
राज्यातील महिला मुलींना पुरेशा सोयी सुविधा उपलब्ध करून रोजगार निर्मितीस चालना देणे, त्यांचे आर्थिक, सामाजिक पुनर्वसन करणे, महिला स्वावलंबी आत्मनिर्भर करणे, महिलांना मुलींना सशक्तीकरणास चालना मिळणे, महिला व त्यांच्यावर अवलंबून असलेल्या मुलांच्या आरोग्य व पोषण स्थिती सुधारणा करणे हे उद्देश ठेवून राज्य शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राज्यातील महिलांसाठी सुरू करण्याचा निर्णय दि. २८ जून २०२४ रोजीच्या शासन निर्णयानुसार घेतला. व माहे जून २०२४ पासून ही योजना संपूर्ण राज्यभरात राबवण्यास सुरुवात झाली. ग्रामीण भागासह शहरी भागात ही या योजनेला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. या अंतर्गत संपूर्ण राज्यभरातून किमान अडीच ते तीन कोटी महिलांना हा लाभ मिळू शकणार आहे.
माहे जून २०२४ पासून ही योजना संपूर्ण राज्यभरात लागू झाल्याने पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद व जिल्हा प्रशासन ही योजना जिल्ह्यातील शहरी भागासह ग्रामीण भागातील प्रत्येक महिला लाभार्थी पर्यंत पोहोचण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रचार व प्रसिद्धी मोहीम राबवण्यात आली. त्यामुळे ही योजना प्रत्येक पात्र लाभार्थ्यापर्यंत पोहोचवून मोठ्या प्रमाणावर अर्ज भरण्यास सुरुवात झाली.
जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी सेविका अंगणवाडी पर्यवेक्षिका व बालविकास प्रकल्प अधिकारी यांचे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत प्रशिक्षण घेण्यात आले. प्रशिक्षणात संबंधितांना अर्ज स्वीकृती, ऑनलाईन अर्ज भरणे व प्राप्त झालेल्या अर्जाची छाननी करणे याबाबतचे अत्यंत काटेकोरपणे प्रशिक्षण देण्यात आले. त्यानंतर सर्व अंगणवाडी केंद्रावर ग्रामपंचायत कार्यालयात योजनेचे अर्ज उपलब्ध करून दिले. तसेच हे अर्ज नारीशक्ती दूत या संकेतस्थळावरही ऑनलाइन उपलब्ध असल्याचे सर्वांना कळविण्यात आले.
==============================================================================
पंढरपूर येथे दि. १ जुलै ते दि. २३ जुलै २०२४ या कालावधीत होणाऱ्या आषाढी कार्तिकी वारीच्या अनुषंगाने मोठ्या प्रमाणावर या योजनेची महिला व बाल विकास विभागाच्या वतीने प्रचार प्रसिद्धी करण्यात आली. तसेच पालखी मार्गावर ही सर्व ठिकाणी योजनेचे बॅनर्स लावून प्रसिद्धी करण्यात आली. ग्रामपंचायत स्तरावर अर्ज भरणे आधार कार्ड अपडेट करणे बँक खाते उघडणे याबाबत शिबिरांचे आयोजन करण्यात येऊन तज्ञ प्रशिक्षकाच्या माध्यमातून प्रशिक्षण देण्यात आले. मंडल स्तरावर उत्पन्न दाखला, रेशन कार्ड अद्यावत करणे बाबत ही शिबिरे घेण्यात आली. आपले सरकार सेवा केंद्र सेतू सुविधा केंद्र यांचेही ऑनलाईन अर्ज भरण्याबाबतचे प्रशिक्षण घेण्यात आले.
=============================================================================
जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद या योजनेच्या अनुषंगाने सर्व जिल्हास्तरीय यंत्रणांचा वारंवार आढावा घेऊन मार्गदर्शक सूचना देत होते. सोलापूर जिल्हा या योजनेच्या अंमलबजावणीत राज्यस्तरावर अग्रेसर राहिला पाहिजे या दृष्टीने ते प्रयत्न करत होते. तसेच जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी ग्राम पातळीवरील जिल्हा परिषदेच्या सर्व यंत्रणांना या योजनेच्या अनुषंगाने अत्यंत कार्यक्षमपणे काम करण्याचे निर्देश दिले. दि. २० जुलै २०२४ रोजी या योजनेचे अर्ज भरून घेण्याच्या अनुषंगाने विशेष ग्रामसभा घेण्याचे आयोजन करण्यात आलेले होते. महापालिका आयुक्त शितल उगले-तेली यांनी सोलापूर महापालिका हद्दीतील महिलांना या योजनेची माहिती देऊन त्यांचे अर्ज भरून घेण्यासाठी महापालिकेच्या यंत्रणेंनी काम केले. त्यामुळे ही योजना ग्रामीण भागासह शहरी भागातील मोठ्या प्रमाणावर पोहोचून जास्तीत जास्त महिला लाभार्थ्यांनी या योजनेत अर्ज केले जात आहेत.
अर्ज स्वीकारण्याच्या अनुषंगाने आधार स्त्रीलिंग असल्याची खातर जमा करण्याची कारवाई आपले सरकार सेवा केंद्रावरील कर्मचारी व अंगणवाडी सेविका यांच्यामार्फत केले जात आहे या योजनेसाठी ग्रामस्तरीय समिती स्थापन केलेल्या आहेत, दर शनिवारी पात्र लाभार्थ्याची यादीचे चावडीवर वाचन करण्यात येत असून अपूर्ण कागदपत्रांची त्रुटीची पूर्तता करून घेण्यात येत आहे. त्यामुळे भरलेल्या अर्जापैकी मंजूर अर्जाची संख्या खूप मोठ्या प्रमाणावर आहे.
===========================================================================
- जिल्ह्यात ऑनलाइन अर्जाची संख्या
- या योजनेअंतर्गत जिल्ह्यात ६ लाख १४ हजार ७०० अर्ज प्राप्त; त्यापैकी ५ लाख ९४ हजार ५८७ अर्जांना विधानसभा क्षेत्र निहाय स्थापन करण्यात आलेल्या समितीकडून मंजुरी मिळालेली आहे. त्यानुसार हे मंजूर झालेले अर्ज थेट निधी मिळण्यासाठी पुणे येथील महिला बाल विकास विभागाचे आयुक्त यांच्याकडे पाठवण्यात आलेले आहेत. त्यानुसार दि.१४ ऑगस्ट २०२४ पासून जिल्ह्यातील लाभार्थ्यांच्या खात्यावर माहे जुलै व माहे ऑगस्ट २०२४ चा प्रत्येकी पंधराशे रुपये प्रमाणे ३००० रुपये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे.
- तालुका निहाय अर्ज मंजूर झालेली संख्या पुढीलप्रमाणे-
- अक्कलकोट ४५ हजार १४८, बार्शी ५५ हजार ४२१, करमाळा ३३ हजार ६३५, माढा ४३ हजार २४७, माळशिरस ६६ हजार २५४, मंगळवेढा ३४ हजार २५८, मोहोळ ३९ हजार ८४८, उत्तर सोलापूर १ लाख ६ हजार ५८१, पंढरपूर ६४ हजार ७८०, सांगोला ४२ हजार ९३० व दक्षिण सोलापूर६२ हजार ४८५.
==============================================================================
महिला लाभार्थी, योजनेचे काम करणाऱ्या ऑपरेटरचा सन्मान
शिवछत्रपती क्रिडा संकुल बालेवाडी, पुणे येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या योजनेच्या राज्यस्तरीय शुभारंभ झाला. याचे थेट प्रक्षेपण हुतात्मा स्मृती मंदिर सोलापूर येथे झाले. यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद व आमदार सुभाष देशमुख यांच्या हस्ते या योजनेचा लाभ मंजूर झालेल्या महिला लाभार्थ्यांना तसेच या योजनेचे अर्ज भरणारे ऑपरेटर यांना प्रतिनिधिक स्वरूपात सन्मानपत्र देण्यात आले. या योजनेत ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी काम करणाऱ्या शासकीय यंत्रणेतील ऑपरेटरांना सन्मानित करण्यात आले. ऑपरेटरने अत्यंत गतिमान पद्धतीने ऑनलाइन अर्ज भरून सोलापूर जिल्ह्याचे संख्या मोठ्या प्रमाणात वाढवण्यास मदत केलेली आहे त्यामुळे मान्यवरांच्या हस्ते या ऑपरेटरच्या कामाचा सन्मान करण्यात आला.
मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळालेल्या अनेक बहिणी भावुक झाल्याचे दिसून आले. सोलापूर शहरातील रहिवासी असलेल्या श्रीमती शमा अस्लम सय्यद या लाभार्थ्यांनी सोलापूर महापालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या वतीने या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज भरलेला होता त्यांना या योजनेअंतर्गत तीन हजार रुपये थेट बँक खात्यावर जमा झालेले आहेत. या पैशातून महिला बचत गटाचा व्यवसाय वाढवण्यास हातभार लागणार असून मुलांच्या शिक्षणासाठी ही त्याचा उपयोग करता येईल असे सांगून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व राज्य शासनाचे त्यांनी आभार व्यक्त केले. सौ सुरेखा बसवराज हिरापुरे सोलापूर यांनाही या योजनेचा लाभ मिळाला असून त्यांच्या बँक खात्यावर तीन हजार रुपये जमा झालेले आहेत. बँक खात्यावर हे पैसे जमा झाल्याचे पाहून त्यांना विश्वास बसेना की या योजनेचा लाभ आपल्याला मिळाला. हे पैसे मिळाल्याने खूप आनंद झाल्याचे सांगून ही योजना निरंतर चालू ठेवण्याची त्यांनी मागणी केली. तसेच मुख्यमंत्री महोदय व राज्य शासनाचे त्यांनी खूप खूप धन्यवाद मानले.
राज्य शासनाची अत्यंत महत्त्वाचे असलेली मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण ही योजना सोलापूर जिल्ह्यात जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत प्रभावीपणे राबवली जात आहे. शहरी व ग्रामीण भागात लाडक्या बहिणींना अर्ज भरण्यासाठी सर्व शासकीय यंत्रणा मार्गदर्शन करत आहे. त्यामुळे या योजनेचे जिल्ह्यात सहा लाखापेक्षा अधिक अर्ज प्राप्त झालेले असून त्यापैकी पाच लाख 94 हजार 587 इतके अर्ज मंजूर झाल्याने प्रशासनाकडून मार्गदर्शन करण्यात आल्याने अर्ज मंजुरीची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. तसेच जे अर्ज कागदपत्राच्या त्रूटी अभावी प्रलंबित आहेत त्या त्रुटी पूर्ण करून घेण्यासाठी ही प्रशासन प्रयत्न करत आहे. कागदपत्राची पूर्तता करणाऱ्या शंभर टक्के महिलांना या योजनेचा लाभ देण्यासाठी प्रशासन कार्यरत आहे.
या योजनेमुळे थेट लाभार्थी महिलांच्या बँक खात्यावर शासनाकडून पैसे जमा केले जात असल्याने खऱ्या अर्थाने महिलांच्या हातात आर्थिक सत्ता येत आहे. व महिला हा आलेला पैसा अत्यंत काटेकोरपणे वापरून या पैशातून महिला आर्थिक सक्षमीकरणाकडे वाटचाल करतील याबद्दल खात्री वाटते.
सुनील सोनटक्के, जिल्हा माहिती अधिकारी, सोलापूर.