मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना; जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांचे निर्देश
by kanya news ||
सोलापूर : जिल्ह्यातील सर्व बँकांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअतर्गत शासनाकडून लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर जमा केलेली रक्कम संबंधित लाभार्थ्यांना त्यांच्या खात्यातून काढण्यास कोणत्याही प्रकारची मनाई करू नये, असे निर्देश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिले.
- जिल्हाधिकारी आशीर्वाद म्हणाले की, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतुन हस्तांतरित केलेले आर्थिक लाभ (रक्कम) कोणत्याही थकित कर्जाच्या बदल्यात समायोजित केले जाऊ नये.
- ही रक्कम विशिष्ट उद्देशासाठी असून, ती इतर कर्ज समायोजनासाठी वापरता येणार नाही. ही रक्कम त्यांच्या खात्यात वर्ग केल्यानंतर लाभार्थी महिलांना कोणत्याही थकबाकीच्या समायोजनामुळे रक्कम काढण्यास नकार देण्यात येऊ नये.
- काही लाभार्थ्यांकडे बँकेचे प्रलंबित असलेल्या कर्जाची परतफेड न केल्यामुळे बँक खाते गोठविण्यात आले असल्यास सदर बँक खाते तत्काळ सुरू करण्यात यावे.
- या योजनेतंर्गत लाभार्थ्यांना प्राप्त होणारी लाभाची रक्कम लाभार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात यावी, अशा सूचना महिला व बाल विकास विभागाचे सचिव यांनी दि. १९ ऑगस्ट २०२४ च्या पत्रानुसार दिलेल्या आहेत.
- तरी या सर्व सूचनांचे जिल्ह्यातील सर्व बँकांनी तंतोतंत पालन करावे. यासाठी जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक यांनी सर्व संबंधित बँकांना या विषयी सूचित करावे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
जिल्ह्यातील सर्व बँकांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थ्याच्या खात्यावर जमा होणारी लाभाची रक्कम कोणत्याही प्रकारे समायोजित करून घेऊ नये. ही रक्कम संबंधित लाभार्थ्यांना त्यांच्या बँक खात्यातून काढण्यासाठी कोणत्याही प्रकारची अडचणी येणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी दिले आहेत.
जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यासाठी हेल्पलाइन क्रमांक जाहीर करण्यात आलेले असून, त्या हेल्पलाईन क्रमांकवर योजनेच्या अनुषंगाने कोणतीही अडचण आल्यास लाभार्थ्यांनी संपर्क साधावा, असेही त्यांनी सांगितले.