आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर महावितरणचा अखंडित वीज पुरवाठ्यासाठी महत्वपूर्ण योगदान
By Kanya News
सोलापूर : पंढरपूरच्या पांडुरंगाला भेटण्यासाठी दरवर्षी जाणाऱ्या आषाढी वारी दिंडी सोहळ्यासाठी सर्वच विभाग वाटा उचलतात. तसाच खारुताईचा वाटा महावितरणचाही असतो. जिथून आषाढी वारी जाते व जिथे –जिथे मुक्कामी राहते त्या परिसराला प्रकाशमान करण्याचे काम महावितरणचे वीज कर्मचारी मोठ्या हिरीरीने करतात. यंदा तर सर्व मुक्कामाच्या ठिकाणी महावितरणने जुन्या तारा काढून एरियल बंच केबल टाकल्याने विजेचा धोकाही कमी झाला आहे.
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज व जगद्गुरु संत तुकाराम महाराज, संत सोपानकाका महाराज या प्रमुख दिंड्यांसोबतच हजारो लहानसहान दिंड्या पंढरपूरच्या दिशेने पायी जातात. त्यांच्या प्रवासात कुठेही अडथळे येऊ नये, त्यांचा प्रवास सुखाचा व्हावा याकरिता महावितरण दरवर्षी विशेष प्रयत्न करत असते. रस्ते क्रॉसिंगच्या वाहिन्यांची उंची वाढविणे, रोहित्रांना तारेचे कुंपण करणे यासह पालखी महामार्गावरील वीज वाहिन्यांचे दिंडी येणापूर्वी देखभाल दुरुस्ती करणे आदी कामाचा समावेश असतो.
सोलापूर जिल्ह्यात 11 जुलै रोजी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची तर 12 जुलै रोजी संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे आगमन होते. माळशिरस तालुक्यात दोन्ही पालखीचे मिळून पाच मुक्काम व 5 रिंगण सोहळे झाले. महावितरणच्या अकलूज विभागातील 25 अधिकारी व 320 वीज कर्मचाऱ्यांनी अखंडित वीजपुरवठा ठेवण्यात योगदान दिले. दरवर्षी विजेची मागणी पाहता यंदाही अनेक रोहित्रांची क्षमता वाढ करुन मोठे हायमास्ट दिवे लावण्यासाठी महावितरणच्या वीज कर्मचाऱ्यांनी मदत केली. माळशिरस तालुक्यात दोन्ही पालखींची भेट होते आणि पुढे पंढरपूर विभागात दिंड्या प्रवेश करतात.
महावितरण पंढरपूर विभागानेही सर्वच पालखी तळांचे सर्व्हेक्षण करुन सर्व तळावरील वीज वाहिन्या एरियल बंच केबल टाकून बदलल्या आहेत. पंढरपूर शहर व शहरालगतच्या भागातील सर्व रोहित्रांना सुरक्षा कवच घातले आहे. जीर्ण झालेले व धोकादायक वीज खांब बदलून सैल तारांना ताण दिलेला आहे. तसेच नवीन पालखी तळांवरही विजेची चोख व्यवस्था केली आहे. दिंड्या, मठ, स्थानिक व्यापाऱ्यांना त्यांच्या मागणीनुसार तात्पुरत्या वीज जोडण्या ताबडतोब देण्यात येत असून, आतापर्यंत पाचशे वीजजोड देण्यात आले आहेत. पंढरपूर विभागाचे 30 अधिकारी व साडेचारशेहून अधिक कर्मचारी विजेच्या बंदोबस्तासाठी अखंडपणे राबत आहेत.
आषाढी वारीच्या अनुषंगाने प्रादेशिक संचालक अंकुश नाळे, मुख्य अभियंता सुनिल पावडे, नूतन अधीक्षक अभियंता सुनिल माने यांच्या मार्गशनाखाली पंढरपूरचे कार्यकारी अभियंता विजय पाटील व अकलूजचे कार्यकारी अभियंता अण्णासाहेब काळे यांच्या टीमने पालखी सोहळ्यात विजेची व्यवस्था चोख ठेवली आहे. त्यासोबतच प्रधानमंत्री सूर्यघर-मुफत बिजली योजना, कुसुम-बी सौर कृषीपंप योजना, गो-ग्रीन आदी योजनांसह विद्युत सुरक्षा व ऑनलाईन वीज सेवेचा प्रसारही महावितरणने वारीच्या माध्यमातून केलेला आहे. त्यासाठी जागोजागी बॅनर लावले असून, सूर्यघर योजनेची माहितीपत्रके सुद्धा वाटप केली आहेत.