image source
समाधानकारक पावसामुळे शेतमजूरांना रोजगार
By Kanya News ।।
चिखली : मोहोळ तालुक्यात समाधानकारक पाऊस झाल्याने शेतकरी राजा सुखावला आहे. यातून शेतीच्या कामांना गती मिळणार असून, शेत मजुरांची शेतात खुरपणी, फवारणी सह अन्य शेतीच्या कामांची लगबग सुरू झाली आहे.
शेतमजूर पुरुष व महिलांना पाऊस पडल्याने शेतातील कामावर जावे लागत आहे. यामुळे शेत मजुरांना सुगीचे दिवस येणार आहेत.पाऊस पडल्याने शेतातील पिके आनंदाने डोलताना दिसून येत आहे. शेतकरी राजाने मका, बाजरी, उडीद या पिकांची पेरणी केली आहे. सतत पाऊस रिमझिम पडत असल्याने शेतात नुकसानदायक तणनिर्मिती झाली आहे. काही ठिकाणी मका पिकावर लष्करी अळीचे प्रमाण वाढले आहे.यातून पिकाची निगा राखण्यासाठी शेतात निंदणी, फवारणी, खाद्य, युरिया टाकण्याचे काम शेतमजुरांना शेतात करावे लागत आहे. शेतातील मका पिकासाठी कोळपणी, नांगरणी करत पिकाची काळजी घेतली जात आहे.
तालुक्यातील चिखली, हिवरे, यावली सह अन्य परिसरातील गावांमध्ये सुध्दा पाऊस मोठ्या प्रमाणात पडल्याने शेतातील कामांना मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना शेत मजूरांची गरज भागत असते. ग्रामीण भागात महिलांचे शेत मजुरीचे प्रमाण जास्त दिसून येते. ग्रामीण भागात शेतमजुरांना थेट घरापासून बांधापर्यंत रिक्षा, टमटम मोटारसायकल, पिकअप आदी वाहनाने मजुरांना शेतात सोडावे लागते. ग्रामीण भागात वेगवेगळ्या ठिकाणी शेत मजूरीचे दर दोनशे ते चारशे रुपयापर्यंत घेतली जाते. पाऊस समाधानकारक झाल्याने विहीर, नदी-नाल्यांना पाणी आले आहे. शेतातील पिकांची या पावसाने भूक भागली असून शेतकरी, शेत मजूर यांनी आनंद व्यक्त केला आहे.
================================================
-
“पाऊस पडल्याने आमच्या सारख्या मजुरांना शेतात कामे मिळाली आहेत. शेतातील कोळपणी, फवारणी, नांगरणी हे कामे करण्यासाठी शेत मजुरांना शेतकरी प्राधान्य देतात. शेतमजुरांना पाऊस पडल्याने रोजगार मिळाला आहे.” – हणमंत शिंदे, शेतमजूर, चिखली