महाराष्ट्र रणजी संभाव्य खेळाडूंच्या संघाचे रणजी
उपविजेत्या विदर्भ संघासोबत दोन सराव सामने
by kanya news||
सोलापूर : सोलापुरातील पार्क क्रीडांगणावर मंगळवार, दि. २० ऑगस्ट २०२४ पासून महाराष्ट्र रणजी संभाव्य खेळाडूंच्या संघाचे रणजी उपविजेत्या विदर्भ संघासोबत दोन सराव सामने खेळविले जाणार आहेत, अशी माहिती महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे प्रशिक्षक सुलक्षण कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
गतवर्षी महाराष्ट्र क्रिकेट संघटनेने सोलापूर जिल्हा क्रिकेट संघटनेला २३ वर्षाखालील महाराष्ट्र संघाचे सराव शिबिराच्या आयोजन, नियोजनाची संधी दिली. त्यानंतर गेल्या मोसमात २ रणजी सामने सोलापुरात यशस्वीरित्या पार पडले. त्यानंतर येथील उत्तम नियोजन आणि व्यवस्था आणि सोलापूर जिल्हा क्रिकेट संघटनेने जपलेली विश्वासार्हता पाहता यावर्षी देखील महाराष्ट्राच्या वरिष्ठ पुरुषांच्या रणजी संघाच्या संभाव्य खेळाडूंचे शिबीर घेण्याची संधी पुन्हा एकदा सोलापूर जिल्हा क्रिकेट संघटनेला देण्यात आली आहे. मागील महिन्यात १५ दिवसात सराव आणि 3 सामने खेळविण्यात आले.
या सराव आणि सामन्यावेळी महाराष्ट्र रणजी संघाचे निवड समितीचे अक्षय दरेकर, रोहित जाधव, सलील आगरकर, किरण आढाव, संग्राम अतितकर यांची उपस्थिती लाभलेली होती. यावर्षी महाराष्ट्र संघाचे नूतन प्रशिक्षक म्हणून सुलक्षण कुलकर्णी यांनी याकाळात खेळाडूंचा कसून सराव घेतला.संभाव्य खेळाडूंचे तीन संघात सराव सामने घेतले. त्यातून निवड समितीने ३८ खेळाडूंची निवड केली असून, त्यांचेदेखील चार दिवसीय दोन सराव सामनेदेखील या ऑगस्ट महिन्यात येथील इंदिरा गांधी पार्क स्टेडियमवर घेण्यात आले होते. याच सामन्यातील व्यवस्था आणि सराव शिबिराचे नीटनेटके आयोजन, नियोजन पाहता तसेच संघ, प्रशिक्षक, निवड समिती सदस्य यांची सोलापूरला दिलेली पसंती पाहता महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे युवा अध्यक्ष आ. रोहित पवार आणि अपेक्स काऊन्सिलच्या सदस्यांनी रणजी संघातील खेळाडूंच्या एका संघाला सामने खेळविण्याची संधी उपलब्ध करून दिली. या संघाला बंगळूरू दौऱ्यावर जाण्यापूर्वी गत मोसमातील रणजी उपविजेता विदर्भ संघासोबत सोलापुरात दोन तीन दिवसीय सामने घेण्याची संधी, जबाबदारी सोलापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनला दिली आहे. त्यामुळे मंगळवार, दि २० ऑगस्टपासून पहिला सामना खेळविला जाणार आहे. दि. २४ ऑगस्टपासून दुसरा सराव सामना होणार आहे.
महाराष्ट्राचा नावाजलेला आणि सध्याचा भारतीय संघातील प्रतिथयश खेळाडू चेन्नई सुपर किंग्स या आयपीएलमधील संघाचा कर्णधार ऋतुराज गायकवाड, सिद्धेश वीर यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र संघ हा रणजी स्पर्धेतील गत मोसमातील उपविजेता विदर्भ संघासोबत दोन हात करणार आहे. महाराष्ट्राच्या या संघात अंकित बावणे, मुकेश चौधरी, अझीम काझी, सचिन धस, आर्शिन कुलकर्णी, राजवर्धन हंगरगेकर, निखील नाईक, दिग्विजय पाटील, रजनीश गुर्बानी, मुर्तझा ट्रंकवाला, मंदार भंडारी, यश क्षीरसागर, रामकृष्ण घोष, सत्यजीत बच्छाव, हितेश वाळुंज यांचा समावेश करण्यात आला आहे. मुख्य प्रशिक्षक सुलक्षण कुलकर्णी, सहाय्यक प्रशिक्षक अमित पाटील यांच्यासह व्यवस्थापक मंदार देडगे संघासमवेत असणार आहेत.
या २० खेळाडूंचा विदर्भ संघ मुख्य प्रशिक्षक उस्मान घनी यांच्या मार्गदर्शनाखाली अक्षय वाडकरच्या नेतृत्वाखाली खेळणार आहे. अतुल रानडे हे सहाय्यक प्रशिक्षक तर अनिरुद्ध देशपांडे हे संघ व्यवस्थापक व तज्ज्ञ विश्लेषक असणार आहेत. दोन्ही संघ सोलापूरात दाखल झाले असून, दुपारच्या सत्रात त्यांनी सरावही केला आहे.
महाराष्ट्राच्या रणजी निवड समितीने निवडलेला दुसरा एक संघ १५ दिवसांच्या पाँडिचेरी येथील दौऱ्यावर जाणार आहे. सोलापूरात आलेला संघ हा रणजी स्पर्धेपूर्वी २७ दिवसाच्या कर्नाटक राज्याच्या बंगलोर येथील दौऱ्यावर जाणार आहे. या दोन्ही संघाचे दोन्ही दौऱ्यातील खेळाडूंची कामगिरी पाहून महाराष्ट्राचा सन २०२४-२५ या मोसमासाठी रणजी संघ घोषित केला जाणार आहे. यावर्षी रणजी स्पर्धा दि ११ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहेत. महाराष्ट्राचा पहिला सामना श्रीनगर येथे जम्मू काश्मीर संघासमावेत होणार आहे. यावर्षी गतविजेता मुंबई संघाचा महाराष्ट्रसोबत मणिपूर , सर्व्हिसेस, ओडिशा, मेघालय, बडोदा, त्रिपुरा, जम्मू काश्मीर या संघांचा समावेश एका गटात करण्यात आला आहे.