
संतप्त ज्येष्ठ नागरिकांचा पालिकेवर धडक मोर्चा अन ठिय्या आंदोलन
by kanya news ||
सोलापूर : अक्कलकोट रोडस्थित हेरिटेज मणीधारी एम्पायर संकुलात अरण्यऋषी मारुती चितमपल्ली वास्तव्यास आहेत. सदर संकुलाचे महापालिकेला हस्तांतरण करण्याची प्रक्रिया दि. ५ नोव्हेंबर २०२३ पासून प्रलंबित असून, महापालिका प्रशासन आणि विकासकांच्या हलगर्जीपणामुळे ती रखडलेली आहे. दरम्यान, हस्तांतराचे कारण पुढे करून विकासकांनी संकुलातील पथदिवे बंद ठेवलेली आहेत. त्यामुळे संकुलात अंधाराचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे संतप्त झालेले हेरिटेज मणीधारी संकुलात राहणारे सोलापूरचे सुपुत्र, ज्येष्ठ साहित्यिक, राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय ख्यातीचे पर्यावरणवादी अरण्यऋषी मारुती चितमपल्ली यांच्यासह संकुलातील अनेक संतप्त रहिवासी, ज्येष्ठ नागरिकांनी यांच्या शिष्टमंडळाने सोलापूर महापालिकेवर धडक मोर्चा काढला आणि ठिय्या आंदोलनही केले.
अंधाराच्या साम्राज्यात व दप्तर दिरंगाईच्या दुष्टचक्रात अडकलेल्या हेरिटेज- मणिधारी वसाहतीबाबत गंभीर दखल घेऊन स्ट्रीट लाईट सुरु होण्याकामी ठोस कारवाईचे आदेश द्यावेत. किमान आपल्या देशाच्या स्वातंत्र्यदिनापुर्वी संकुलातील अंधार दूर करावा, अशी रास्त मागणी आंदोलनकर्त्यांनी लाऊन धरली. दरम्यान, पालिका आयुक्त शीतल तेली-उगले यांनी यासंदर्भात तातडीने पावले उचलण्याची हमी शिष्टमंडळाला दिली.
आधीच पावसाळा त्यात स्ट्रीट लाइट बंद ठेवल्याने चोऱ्या – माऱ्या, साप- विंचवांचा सुळसुळाट यामुळे येथील नागरिकांच्या जीवीतास व मालमत्तेसही धोका निर्माण झाला असल्याचे प्लाॅट धारक संयुक्त कृती समितीने संबंधित अधिकार्यांना वारंवार भेटून, पालिका आयुक्त, उपायुक्तांची प्रत्यक्ष भेट घेऊन तसेच निवेदने सादर करून गाऱ्हाणी मांडलेली आहेत. मात्र अद्याप प्रश्न निकाली काढण्यात आलेला नाही. त्यामुळे नेलाजास्तव त्रस्त आणि संतप्त ज्येष्ठ नागरिकांनी शुक्रवार, दि. ९ ऑगस्ट २०२४ रोजी महापालिकेवर धडक मोर्चा काढून ठिय्या आंदोलन केले.

आंदोलनाचे नेतृत्व विजयकुमार भोसले, गजानन होनराव, संजय जोगीपेटकर, सचिन पतंगे, रविंद्र मच्छा, शिवाजी क्षीरसागर यांनी केले. मल्लप्पा मुळजे, अंकुश माने, नागेश आळगी, नारायणसा बुरबुरे, विश्वनाथ काळे, श्रीनिवासन चिट्टमपल्ली, श्रीकांत चिट्टमपल्ली, अशोक दंडी, नागनाथ दंडी, अंबादास खराडे, राहुल कलशेट्टी, शिवाजी खमीतकर, त्र्यंबक जाधव, बब्रुवान पवार, दत्तात्रय म्हमाणे, धानय्या स्वामी, गुरुशांतप्पा गाडी, भीमाशंकर शिवगुंडे, रामचंद्र बिराजदार, दादासा मिस्कीन, दत्तात्रय झाडे, अविनाश ढोले यांनी विशेष प्रयत्न केले.