दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र लाभार्थ्यांना टपालाद्वारे घरपोच करणार

  • जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद : दिव्यांगांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून द्या
  • दिव्यांग व्यक्ती अस्मिता अभियान: बार्शी येथील शिबिरात दोन दिवसात १ हजार ५९९ लाभार्थ्यांची तपासणी
  • दिव्यांग प्रमाणपत्र शिबिरात ६ दिवसात ४ हजार  ८५९ लाभार्थ्यांची तपासणी

कन्या न्यूज नेटवर्क ||

सोलापूर : जिल्ह्यात दिव्यांग व्यक्ती अस्मिता अभियानाअंतर्गत दिव्यांग प्रमाणपत्र शिबिराच्या सहाव्या दिवशी  पंढरपूर, अक्कलकोट, बार्शी तालुक्यातील ४ हजार ८५९ लाभार्थ्यांनी शिबिरात तपासणी करून घेतलेली आहे. दिव्यांग व्यक्तीकडून जिल्हा प्रशासनाच्यावतीने आयोजित केलेल्या शिबिराला चांगला प्रतिसाद मिळत आहे. शिबिराच्या ठिकाणी शासनाच्या अन्य योजनांचा लाभ दिव्यांगाना देण्यासाठी संबंधित विभागाचे माहिती स्टॉल्स लावण्यात आलेले आहेत. अन्य शासकीय योजनातून दिव्यांगांना लाभ देऊन समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असल्याचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सांगितले.

या अभियानाअंतर्गत तपासणी व निदान विशेष मोहीम दि. १९  ऑगस्ट २०२४  पासून सुरू झालेले आहे. पंढरपूर व अक्कलकोट तालुकास्तरीय शिबिरे झालेली आहेत. या दोन्हीही शिबिरात ३२६० दिव्यांग लाभार्थ्यांची तपासणी करण्यात आली. दि. २६ ऑगस्ट रोजी शिबिराच्या पाचव्या दिवशी बार्शी येथे ८०१ व दि. २७ ऑगस्ट रोजी ७९८ लाभार्थ्यांची तपासणी करण्यात आली, असे एकूण सहा दिवसात ४ हजार ८५९ लाभार्थ्यांनी या विशेष मोहिमेअंतर्गत तपासणी करून घेतलेली आहे. या अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना दिव्यांगात्व प्रमाणपत्र त्यांनी दिलेल्या त्यांच्या पत्त्यावर टपालाद्वारे पाठवण्याची व्यवस्था प्रशासनाच्यावतीने करण्यात येत असल्याची माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली.

जिल्ह्यात ही मोहीम दि. १९ ऑगस्ट ते दि. २३ सप्टेंबर २०२४ या कालावधीत राबविण्यात येत आहे. या अंतर्गत प्रत्येक तालुक्यात दोन दिवस याप्रमाणे २२ शिबिरांचे आयोजन करण्यात आलेले आहे. या शिबिरातून १५ हजार ६६६ दिव्यांग लाभार्थ्यांना दिव्यांगात्वाची तपासणी करून प्रमाणपत्र देण्याचे नियोजन आहे. पंढरपूर, अक्कलकोट या दोन तालुक्यातील तीन हजार दोनशे सात लाभार्थ्यांची तपासणी झालेली आहे.  बार्शी येथे दि. २६ व दि. २७ ऑगस्ट रोजी ग्रामीण रुग्णालयात हे शिबीर घेतले जात आहे. तरी प्रत्येक तालुक्यातील पात्र लाभार्थ्यांनी या शिबिरात येऊन तपासणी करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी केले.

================================================================================

२२  शिबिरातून १५ हजार ६६६ दिव्यांग लाभार्थ्याची तपासणी होणार

जिल्ह्याच्या अकरा तालुक्यात प्रत्येकी दोन याप्रमाणे एकूण २२ शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे. यासाठी १५ हजार ६६ दिव्यांग लाभार्थ्यांनी नोंदणी केलेली आहे. जिल्ह्यातील दिव्यांगांची संख्या १ लाख १५ हजार ७५५ इतकी आहे. यातील ६८ टक्के ग्रामीण भागातील तर शहरी भागातील ३२ टक्के दिव्यांग संख्या आहे. आशाताई आणि यंत्रणेतील तालुका स्तरावरील संबंधित घटकांसाठी २७ कार्यशाळा घेण्यात आले असून, त्यातून ३७४२ प्रशिक्षणार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात आल्याची माहिती मित्राचे संचालक अभिजीत राऊत यांनी दिली.

===========================================================================

शिबिराचे वेळापत्रक 

जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींना दिव्यांगत्व प्रमाणपत्र आणि वैश्विक ओळखपत्र देण्यासाठी दिव्यांगत्व प्रमाणपत्र तपासणी आणि निदान विशेष मोहिम कार्यक्रम शिबीर वेळापत्रक तालुका, लाभार्थी संख्या, शिबीर स्थळ, दिनांक, वार व वेळ निहाय पुढीलप्रमाणे –

  • माळशिरस : १७२०, ग्रामीण रुग्णालय, माळशिरस, दि. २९ व दि. ३० ऑगस्ट २०२४, गुरुवार व शुक्रवारी सकाळी ९ ते दुपारी ४ वाजता. 
  • सांगोला  : १८०३, ग्रामीण रुग्णालय, सांगोला, दि. २ व दि.३ सप्टेंबर २०२४, सोमवार व मंगळवारी सकाळी ९ ते दुपारी ३ वाजता. 
  • करमाळा : १६२९, ग्रामीण रुग्णालय, करमाळा, दि. ५ व ६ सप्टेंबर २०२४, गुरुवार व शुक्रवारी सकाळी ९ ते दुपारी ३ वाजता. 
  • मोहोळ : १८४१, ग्रामीण रुग्णालय, मोहोळ, दि. ९, १० व १२ सप्टेंबर २०२४, सोमवार, मंगळवार  व गुरुवारी सकाळी ९ ते दुपारी ३ वाजता. 
  • माढा : १२९२, ग्रामीण रुग्णालय, कुर्डूवाडी, दि. १३ व १४ सप्टेंबर २०२४, शुक्रवार व शनिवारी सकाळी ९ ते दुपारी ३ वाजता. 
  • मंगळवेढा : ८०८, ग्रामीण रुग्णालय, मंगळवेढा, दि. १७ व १९ सप्टेंबर २०२४, मंगळवार व गुरुवार सकाळी ९ ते दुपारी ३ वाजता. 
  • सोलापूर दक्षिण : १२९४, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, सोलापूर, दि. २० व २१ सप्टेंबर २०२४, शुक्रवार व शनिवारी सकाळी ९ ते दुपारी ३ वाजता. 
  • सोलापूर उत्तर : ५६१, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, सोलापूर, दि. २३ सप्टेंबर २०२४, सोमवारी सकाळी ९ ते दुपारी ३ वाजता. 

=========================================================================

पंढरपूर, अक्कलकोट तालुक्यातील शिबीर

पंढरपूर : ग्रामीण रुग्णालय, पंढरपूर, दि. १९ व २० ऑगस्ट २०२४, सोमवार व मंगळवारी सकाळी ९ ते दुपारी ३ वाजता दिव्यांग तपासणी शिबीर झाले. अक्कलकोट ग्रामीण रुग्णालय, अक्कलकोट, दि. २२ व २३ ऑगस्ट २०२४, गुरुवार व शुक्रवारी सकाळी ९ ते दुपारी ३ वाजता शिबीर  झाले.

पंढरपूर, अक्कलकोट तालुक्यात एकूण ३२६० दिव्यांग लाभार्थीची तपासणी करण्यात आली. यामध्ये दृष्टीहीन ४२२, बौद्धिक अपंगत्व ६५६, श्रवणदोष ५१७, लोकोमोटर अपंगत्व १३६६, बालरोग २९९ असे एकूण ३२६० रुग्णांची तपासणी करण्यात आली. शिबिराचा पाचवा दिवस व बार्शी तालुक्याचा पहिला दिवस दि. २६ ऑगस्ट २०२४ रोजी शिबिर घेण्यात आले. बार्शी येथील शिबिरात दोन दिवसात १ हजार ५९९ लाभार्थ्यांची तपासणी करण्यात आली. यामध्ये दृष्टीने १७०, बौद्धिक अपंगत्व ३०४, श्रवणदोष २६८, लोकोमोटर अपंगत्व ५८५, बालरोग १३७ तर औषधे देण्यात आलेले रुग्ण १३५ आहेत, अशी माहिती संचालक अभिजीत राऊत यांनी दिली. माळशिरस ग्रामीण रुग्णालय येथे दि. २९ व ३० ऑगस्ट रोजी सकाळी नऊ ते दुपारी तीन या वेळेत आयोजित करण्यात आलेल्या दिव्यांग प्रमाणपत्र शिबिरासाठी तालुक्यातील जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी तपासणीसाठी यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

× Contact