वसुलीत बारामती परिमंडळ नंबरवनवर ठेवण्याचे ध्येय
कन्या न्यूज नेटवर्क ||
बारामती : महावितरण बारामती परिमंडलाचे ८ वे मुख्य अभियंता म्हणून धर्मराज पेठकर यांनी बुधवारी (दि. १ जानेवारी २०२५) पदभार स्विकारला आहे. नवीन वर्षात बारामतीला नवीन अभियंता मिळाल्याने अधिकारी-कर्मचाऱ्यांनी त्यांचे मोठ्या उत्साहात स्वागत केले आहे.
मुळचे लातूर जिल्ह्यातील असलेले धर्मराज पेठकर यांनी तत्कालिन महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळात १९९४ साली कनिष्ठ अभियंता म्हणून वीज क्षेत्रातील सेवेला सुरुवात केली. २००६ साली ते कार्यकारी अभियंता झाले. भांडुप, ठाणे, कल्याण, निलंगा, सांघिक कार्यालय, पुणे व सातारा येथे त्यांनी कार्यकारी अभियंता म्हणून जबाबदारी सांभाळली. २०१७ मध्ये ते अधीक्षक अभियंतापदी कल्याण, पुणे व कोकण प्रादेशिक विभागात तर २०२० पासून २०२४ पर्यंत त्यांनी सांगली मंडलचे अधीक्षक अभियंता म्हणून काम केले आहे.
डिसेंबरच्या अखेरीस सांघिक कार्यालयाने पेठकर यांची पदोन्नतीवर बारामती परिमंडलाचे मुख्य अभियंता म्हणून पदस्थापना केली होती. त्यानुषंगाने नूतन वर्षाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी मुख्य अभियंता पदाचा पदभार स्विकारला व कामाला सुरुवात केली. कर्तव्यनिष्ठ, ग्राहकाभिमुख तसेच कर्मचाऱ्यांप्रती प्रेमळ असलेले अभियंता म्हणून पेठकर यांची ओळख आहे. पदभार स्विकारताच नूतन मुख्य अभियंता धर्मराज पेठकर यांनी बारामती परिमंडलातील वरिष्ठ अभियंते व अधिकाऱ्यांची बैठक घेतली.
धर्मराज पेठकर म्हणाले, आपण सर्वजण एक टीम म्हणून काम करु. आपल्याला वेळोवेळी दिलेले उद्दिष्ट पूर्ण करु. विजेची हानी कमी करणे व वसुलीत बारामती नंबर एकवर ठेवणे हेच माझे ध्येय असल्याचे त्यांनी सांगितले.