नियोजन भवन येथे जिल्ह्यातील सर्व शासकीय विभागप्रमुखांसाठी
आपले सरकार पोर्टलविषयी प्रशिक्षणाचे आयोजन
by kanya news ||
सोलापूर : नागरिक आणि प्रशासन यांना ऑनलाईन संवाद साधण्यासाठी सेतू निर्माण करणारा “आपले सरकार २.०” हा शासनाचा महत्वपूर्ण प्रकल्प आहे. राज्यातील नागरिकांसाठी ऑनलाईन पध्दतीने तक्रार दाखल करता यावी, यासाठी आपले सरकार २.० पोर्टल निर्माण करण्यात आले आहे. तरी सोलापूर जिल्ह्यातील सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी या पोर्टलवर आलेल्या तक्रारींचा निपटारा वेळेत करून दिला पाहिजे, असे आवाहन ई- गव्हर्नसचे तंत्रज्ञ देवांग दवे यांनी केले.
नियोजन भवन समितीच्या सभागृहात आयोजित आपले सरकार २.० पोर्टल तक्रार निवारण प्रणालीची कार्यपद्धतीबाबत विशेष प्रशिक्षणात दवे मार्गदर्शन करत होते. त्यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी मनिषा कुंभार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहीनकर, महापालिका अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, पोलीस उपायुक्त विठ्ठल कुबाडे, उपजिल्हाधिकारी महसूल अमृत नाटेकर, तंत्रज्ञ समीर काळे यांच्यासह सर्व संबंधित यंत्रणांना प्रमुख, ऑनलाईन द्वारे उपविभागीय अधिकारी, तहसीलदारही उपस्थित होते.