अकलूज येथे जिल्हा वार्षिक क्रीडा, सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन

कन्या न्यूज नेटवर्क ||

सोलापूर   : अकलूज येथे दि. १० ते १२ जानेवारी २०२५ दरम्यान जिल्हास्तरीय नगरपरिषद,नगरपंचायत जिल्हा वार्षिक क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव २०२४-२५ चे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती जिल्हा सह आयुक्त विणा पवार यांनी दिली.

आयुक्त तथा संचालक  नगरपरिषद प्रशासन संचालनालय व जिल्हा सहआयुक्त नगरपरिषद  प्रशासन यांच्या मार्गदर्शनाखाली या जिल्हास्तरीय नगरपरिषद, नगरपंचायत जिल्हा वार्षिक क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव २०२४-२५ चे अकलूज येथे आयोजन केले आहे.

या महोत्सवात सोलापूर  जिल्हयातील १७ नगरपरिषदा, नगरपंचायती व जिल्हा सहआयुक्त कार्यालय अशी एकूण १८ कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी  सहभागी होऊन आपले क्रीडा तसेच सांस्कृतिक क्षेत्रातील नैपुण्य दाखविणार आहेत. या महोत्सवाचे यंदाचे यजमानपद अकलूज नगरपरिषदेला मिळाले आहे. विजयसिंह मोहिते -पाटील क्रीडा संकुल ,अकलूज येथे शुक्रवार, दि. १० जानेवारी २०२५ रोजी सकाळी ९  वाजता नगरपरिषद प्रशासन, पुणे विभागाच्या  सह आयुक्त  पूनम मेहता यांच्या हस्ते या महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी  कुमार आशीर्वाद हे राहणार आहेत.

  • या  महोत्सवात बॅडमिंटन, रस्सीखेच, टेबल-टेनिस, बुद्धीबळ, गोळा फेक, थाळी फेक, लांब उडी, उंच उडी, कॅरम, धावणे, चालणे, रिले, क्रिकेट, कबड्डी, व्हॉलिबॉलसह अन्य मैदानी खेळ होणार आहेत. पाककला, रांगोळी, समूह नृत्य, गायन, वेशभूषा आदी सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत.  

सदरच्या स्पर्धा  व सांस्कृतिक कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी जिल्हा सह आयुक्त  विणा पवार  यांच्या   मार्गदर्शनाखाली  जिल्हयातील सर्व नगरपरिषद यांचे मुख्याधिकारी व अधिकारी – कर्मचारी कामकाज पाहत आहेत.  सांस्कृतिक कार्यक्रम व बक्षिस वितरण समारंभ स्मृतीभवन यशवंत नगर ,अकलूज  येथे दि. १२ जानेवारी  २०२५ रोजी दुपारी १२  वाजता  होणार आहे.  यासाठी  जिल्हा क्रीडा अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी यांचे सहकार्य लाभणार आहे. सदर कार्यक्रमास शंकरराव मोहिते महाविद्यालय, अकलूज या कॉलेजचे प्राचार्य व पंच यांचे सहकार्य लाभणार आहे .

“Health is wealth” असा संदेश या क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवात दिला जाणार आहे. कलागुणांना वाव मिळणे, रोजच्या धकाधकी व तणावातून मुक्त होऊन छंद जोपासण्यासाठी अधिकारी, कर्मचारी यांना प्रोत्साहित करणे,  एक नवी उर्जा घेऊन नवनवीन सकारात्मक कामे करण्यासाठी सज्ज होण्यासाठी हा क्रीडा व  सांस्कृतिक महोत्सव आयोजित केला आहे. तरी जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा आणि सांस्कृतिक महोत्सवाची नियोजनबध्द तयारी  करण्यात आल्याची माहिती जिल्हा सह आयुक्त  विणा पवार यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

× Contact