अमोल राजे पैलवान ग्रुपच्या पहिलवानांचा स्तुत्य उपक्रम
कन्या न्यूज नेटवर्क ||
सोलापूर : अक्कलकोट येथील अमोल राजे पैलवान ग्रुपच्यावतीने गणेशोत्सवानिमित विविध शाळा, संस्थामध्ये गोरगरीब विद्यार्थ्यांना फळे, अल्पोहाराचे वाटप करण्यात आले.
बादोला येथे गणेशोत्सव निमित्ताने तालमीतील पैलवान मंडळींनी हिंदू-मुस्लिम एकता गणेशोत्सव मंडळातर्फे पाश्चात्य संस्कृतीला फाटा देऊन आपल्या भारतीय संस्कृतीचे निखळ दर्शन घडवून आणले. या मंडळाने महादेवराव काशिरायाकाका पाटील आश्रम शाळा (साफळे), जिल्हा परिषद प्राथमिक शाळा (बादोला) येथील गोरगरीब विद्यार्थ्यांना केळी, चिकू, चिवडा या सर्व पदार्थांचे वाटप करून त्यांचा आनंद द्विगुणित केला.
यावेळी डबल उपमहाराष्ट्र केसरी मौलाली शेख यांच्या मार्गदर्शनाखाली, अक्कलकोट येथील पैलवान महेश कुलकर्णी, मारुती मुळे, सिद्धाराम खरात (बदोला) यांच्या सहकार्याने पहिलवान सिद्धाराम धायगुडे, अक्रम शेख, सादिक शेख, दत्ता खरात, सचिन खरात, व्यंकटेश कुलकर्णी, गोपीकिशन गायकवाड, कादिर शेख, पांडुरंग बंडगर, सुभाष वाघमोडे, नवाज शेख, मुस्ताक शेख, केशव बंडगर या सर्व पहिलवानांकडून दोन्ही शाळेतील विद्यार्थ्यांना गणेश प्रसादाचे वाटप करण्यात आले.
यासाठी दोन्ही शाळांचे शिक्षक, मुख्याध्यापक आणि कर्मचारी वर्ग यांचे सहकार्य लाभले. त्यांनी अमोल राजे ग्रुप (बादोला) व अक्कलकोट येथील पहिलवानांचे कौतुक करून त्यांचे आभार मानले.