मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन
कन्या न्यूज नेटवर्क ||
सोलापूर : सोलापुरात रोजगार निर्मितीसाठी आयटी पार्क उभारण्यात येईल,असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. दहिटणे, शेळगीतील १ हजार ३४८ सदनिकांच्या वितरणप्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, सोलापूरमध्ये आयटी पार्क उभे केल्यास युवकांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होईल. जिल्हा प्रशासनाने उत्तम जागा शोधल्यास महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या माध्यमातून आयटी पार्क उभारण्यात येईल आणि येथे आयटी उद्योग आणण्यात येतील. शहरात उद्योगासाठी आवश्यक चांगले रस्ते आणि विमानसेवा उपलब्ध झाल्याने येथील औद्योागिक विकासावर भर देण्यात येईल, असेही प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

शहरातील जल वितरण वाहिनीच्या ८५० कोटींच्या प्रकल्पाला मान्यता
सोलापूर शहराच्या सर्वांगीण विकासावर भर देण्यात येत असल्याचे नमूद करून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, सोलापूरमध्ये बंद जलवाहिनीने पाणी आणण्यात येणार आहे. सांडपाणी प्रकल्पाच्या जागेचा प्रश्न दूर करण्यात आला असून, ते कामही सुरू करण्यात आले आहे. शहरातील जल वितरण वाहिनीच्या ८५० कोटींच्या प्रकल्पाला मान्यता देण्यात आली आहे. सोलापूर शहरातील नागरिकांना दररोज शुद्ध पिण्याचे पाणी मिळावे असे प्रयत्न करण्यात येत आहेत. विमानतळाचे अतिरिक्त कामही लवकरच करण्यात येणार आहे.

