मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन
कन्या न्यूज नेटवर्क ||
सोलापूर : अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाने अडीच हजार लोकांना कर्ज देऊन स्वावलंबी उद्योजक होण्यास मदत केली आहे. या महामंडळाच्या माध्यमातून मराठा समाजात उद्योजक तयार करायचे आहेत. महामंडळाच्या माध्यमातून राज्यात १ लाख ५२ हजार उद्योजक तयार झाले असून, सुमारे १३ हजार कोटी रुपये कर्ज उपलब्ध करून दिले आहेत. इतरांना रोजगार देणारा उद्योजक उभा रहात असल्याचे समाधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले आहे.
प्रधानमंत्री आवास योजना (शहरी)अंतर्गत म्हाडातर्फे उभारण्यात आलेल्या दहिटणे, शेळगीतील सदनिकांच्या वितरण प्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळातर्फे धनादेश वितरणासंदर्भात बोलत होते.

दहिटणेतील राष्ट्र तेज अटल कामगार गृहनिर्माण सहकारी संस्थेअंतर्गत १ हजार १२८ आणि शेळगी येथील श्री सोमवंशीय सहस्त्रार्जुन क्षत्रीय समाज महालक्ष्मी गृहनिर्माण सहकारी संस्थेंतर्गत २२० अशा एकूण १ हजार ३४८ सदनिकांच्या वितरण प्रसंगी ते बोलत होते.
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरुपात घरकूलाच्या १० लाभार्थ्यांना चावीचे वितरण करण्यात आले. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळातर्फे ४ लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या धनादेशाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. सोलापूर सोशल फाऊंडेशनतर्फे आयोजित होणाऱ्या सोलापूर जिल्हा पर्यटन महोत्सवाच्या बोधचिन्हाचे अनावरणही मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.

