कृषी पर्यटननिवासस्थाने आणि जागतिक पर्यटन सप्ताहाची रूपरेषा

कन्या न्यूज नेटवर्क ||

सोलापूर : सोलफुल (Soulful)  सोलापूर उपक्रमांतर्गत आयोजित पर्यटन विकास कार्यशाळेचे उद्घाटन  आमदार सुभाष देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. दि.  27 सप्टेंबर 2025 रोजी जागतिक पर्यटन दिवस साजरा करण्याच्या अनुषंगाने दि. 27 सप्टेंबर ते दि. 2 ऑक्टोबरदरम्यान पर्यटन सप्ताह साजरा केला जाणार असल्याचे सांगण्यात आले.

यावेळी जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी शुक्राचार्य भोसले, पुणे विभागाचे पर्यटन समन्वयक अधिकारी सूर्यकांत भुजबळ, पर्यटन उपसंचालक कुंभार, पर्यटन प्रकल्प अधिकारी मयूर नांगरे, सहाय्यक पर्यटन अधिकारी गुणवंत पवार, जिल्हा उपनिबंधक सहाय्यक आबासाहेब गावडे, पर्यटन विभाग महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त कृषी पर्यटन केंद्र संचालक समिती अध्यक्ष लहू अवताडे, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक राम वर्खडे  आदी उपस्थित होते.

यावेळी आमदार सुभाष देशमुख यांनी चिंचणी गावाच्या पर्यटन विकासाचा यशस्वी अनुभव  सांगत”आई योजना” अंतर्गत महिलांना व्यवसायासाठी कर्ज उपलब्ध करून देण्याची माहिती दिली. त्यांनी जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांना ऐतिहासिक स्थळांना भेटी देण्याचे आवाहन केले. कुडल येथील 800 वर्षांपूर्वीच्या शिलालेखासारख्या ठिकाणांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्याचे महत्त्व अधोरेखित केले. पर्यटन सप्ताहात व्यापाऱ्यांनी सवलतीच्या दरात सेवा देण्याचे आवाहन त्यांनी केले.

  • जिल्हा अध्यक्ष कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले यांनी कृषी पर्यटन योजनेच्या माध्यमातून शेततळे, फळबाग, नर्सरीसाठी सहाय्य उपलब्ध असल्याचे सांगितले. त्यांनी शाश्वत शेतीच्या संकल्पनेवर भर देत जमिनीची सुपीकता राखण्याच्या गरजेवरही प्रकाश टाकला.

  • पुणे विभागाचे पर्यटन अधिकारी अभिजीत उघडे यांनी निवासस्थानांच्या विविध प्रकारांची माहिती दिली. त्यात स्थानिक कुटुंबासोबत राहण्याची संकल्पना, वेकेशन होम, पर्यटक व्हिला आणि पर्यटक अपार्टमेंट यांचा समावेश होता. महा बुकिंग प्रणालीवर व्यवसायाची नोंदणी करून प्रमाणपत्र मिळवता येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

  • या कार्यशाळेत उपस्थित उद्योजकांनी जल पर्यटनातील बोटींची मागणी, नर्सरी नोंदणी प्रक्रिया आणि शेती परिसरातील निवासस्थाने उभारण्यासाठी कर्ज योजनांबाबत प्रश्न विचारले. काही निवासस्थाने हायवेपासून अर्धा किलोमीटर अंतरावर असून, तेथे विदेशी पर्यटकही भेट देत असल्याचे एका घरमालकाने सांगितले.

  • या कार्यशाळेच्या माध्यमातून सोलापूर जिल्ह्यातील पर्यटन, कृषी आणि महिला उद्योजकता यांना नवी दिशा मिळणार असून, पर्यटन सप्ताहाच्या आयोजनामुळे जिल्ह्याचा सांस्कृतिक आणि आर्थिक विकास अधिक गती घेईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

प्रास्ताविक पर्यटन समन्वयक भुजबळ यांनी केले. या सप्ताहात सोलापूर जिल्ह्यातील प्रमुख पर्यटन स्थळांना भेटी देण्यात येणार आहेत. पर्यटन दिंडीचे आयोजनही करण्यात येणार आहे. कृषी पर्यटन केंद्रांमुळे ग्रामपंचायतींना आर्थिक लाभ होत असल्याचे त्यांनी नमूद केले. सोलापूर जिल्ह्यासह धाराशिव जिल्ह्यातील पर्यटन व्यवसायिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *