आमदार देवेंद्र कोठे यांनी स्वीकारली निवेदने : विकासकामांबद्दल नागरिकांनी केला सन्मान
कन्या न्यूज नेटवर्क ||
सोलापूर : शहर मध्य विधानसभा संघाचे आमदार देवेंद्र कोठे यांनी सोमवारी आयोजित केलेल्या ‘ देव यज्ञ ‘ जनता दरबारात नागरिकांच्या गाऱ्हाणी ऐकून घेतल्या आणि त्यांच्या समस्यांचे निराकरण केले. शहरातील विविध भागातील नागरिकांनी आमदार देवेंद्र कोठे यांना विविध मागण्यांची निवेदने दिली.
सोमवारी सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत चाललेल्या ‘ देव यज्ञ ‘ जनता दरबारात नागरिकांनी रस्ते, पाणी, उद्याने, दिवाबत्ती, रोजगार, कामगार, वैद्यकीय, नोकरी आदी समस्या आणि त्यांच्या व्यथा मांडल्या. यावेळी आलेल्या शेकडो नागरिकांशी संवाद साधला. आमदार देवेंद्र कोठे यांनी त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. अनेक अर्जांवर तत्काळ निर्णय घेण्यासाठी आमदार देवेंद्र कोठे यांनी जागेवरच संबंधित शासकीय कार्यालयातील अधिकाऱ्यांना संपर्क साधून नागरिकांच्या अडचणी सोडविल्या.
नागरी सहकारी बँकेच्या ६२० थकबाकीदारांची थकबाकी १६ टक्के व्याजदराने आकारण्याचा निर्णय झाला होता. या विरोधात थकबाकीदार यांनी आमदार देवेंद्र कोठे यांच्याकडे ही समस्या सोडविण्याबाबत यापूर्वी निवेदन दिले होते. त्यानंतर आमदार देवेंद्र कोठे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांच्याकडे पाठपुरावा केला. थकबाकीदारांकडून वन टाईम सेटलमेंट योजनेतून १६ टक्क्यांऐवजी एनपीए झालेल्या दिवसापासून ६ टक्के व्याजदराने वसुली करण्याचा निर्णय करून घेतला. शासनाच्या या निर्णयामुळे २७२ यंत्रमाग युनिट ६ टक्के व्याजदराने थकबाकी भरल्यानंतर कर्जमुक्त होणार आहेत. परिणामी शेकडो कामगारांना रोजगार उपलब्ध होणार आहे. आमदार देवेंद्र कोठे यांनी याकामी पाठपुरावा केल्याबद्दल त्यांचा नागरिकांच्यावतीने सन्मान करण्यात आला.