जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले यांचे आवाहन
कन्या न्यूज नेटवर्क ||
सोलापूर : युरोपियन युनियन व इतर देशांना आंबा निर्यातीसाठी अपेडाच्या मँगोनेट प्रणालीद्वारे निर्यातक्षम आंबा बागांची नोंदणी केली जाते. सन २०२४-२५ मध्ये आज अखेर महाराष्ट्रमध्ये ९ हजार ४५९ तर सोलापूर जिल्ह्यातून ५३९ निर्यातक्षम आंबा बागांची नोंदणी झालेली आहे. निर्यातक्षम आंबा बागाची मॅगोनेट या ऑनलाईन प्रणालीवर नोंदणी करण्याची अंतिम दि. ३१ डिसेंबर २०२५ होती. परंतु अपेडा नवी दिल्ली कार्यालयाकडे विनंती करून ही मुदत दि. २८ फेब्रुवारी २०२५ पर्यंत वाढविण्यास आली आहे. त्यामुळे उर्वरित कालावधीत विशेष मोहीम राबवून निर्यातक्षम आंबा बागांची नोंदणी कृषी विभागामार्फत करण्यात येत आहे.
निर्यातक्षम आंबा फळबागेत राबवायच्या योग्य कृषी पध्दती राबविणे आवश्यक आहे. युरोपीय युनियन व अमेरिका देशाला आंबा निर्यात करण्यासाठी क्षेत्रीय / शेतकरी स्तरावर ठेवायचे दस्तऐवजचे विहित प्रपत्रात जतन करण्यात यावे. याबाबतच्या सूचना आयुक्तालयाचे दि. ६ जून २०२४ व दि. १४ फेब्रुवारी २०२५ रोजीच्या पत्राने देण्यात आल्या आहेत. निर्यातक्षम आंबा बागांची नोंदणी करण्यासाठी शेतकऱ्यांनी विहित नमुन्यात (प्रपत्र १) अर्ज दाखल करावा. त्यानंतर तपासणी अधिकाऱ्यांमार्फत क्षेत्राची तपासणी करून प्रपत्र ४ अमध्ये अहवाल जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांना सादर केला जातो. त्यानंतर २ व प्रपत्रात नोंदणी प्रमाण पत्र अदा केले जाते. शेतकऱ्यांनी पिक संरक्षणाच्या दृष्टीने शेतात राबविण्यात येणाऱ्या महत्वाच्या बाबींच्या नोंदी प्रपत्र क मध्ये नोंदी वेळेत घेणे आवश्यक आहे.
जिल्ह्यातील आंबा बागायतदारांनी सन २०२४-२५ मध्ये चालू हंगामाकरिता नोंदणी करण्यासाठी संबंधित कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक, कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी कार्यालय यांच्याशी संपर्क साधून मॅगोनेटद्वारे नोंदणीसाठी त्वरीत अर्ज करण्यात यावेत. प्रथम नोंदणी व नूतनीकरण करणेसाठी विहीत नमुन्यातील अर्ज, सातबारा, ८ अ, बागेचा नकाशा व आधार कार्ड आदी कागदपत्राची आवश्यकता आहे.
मॅगोनेटद्वारे नोंदणी करण्याची वाढीव व अंतिम मुदत दि. २८ फेब्रुवारी २०२५ अशी आहे. निर्यातक्षम आंबा बागांची वेळेत नोंदणी करण्यासाठी संबंधित जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांच्या कार्यालयाशी संपर्क साधून विहीत मुदतीत नोंदणी करावेत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले यांनी केले आहे.