– पालकमंत्री दत्तात्रय भरणे
दोन्ही डोस घेतलेल्या जिल्ह्यातील नागरिकांची एकूण संख्या ३० लाख ८ हजार ६६७
कन्या न्यूज सेवा| सोलापूर, दि. 1३ नोव्हेंबर-
जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असली तरी कोरोनाचा संपूर्ण नायनाट झालेला नाही. त्यामुळे कोरोनाचा प्रतिबंध करण्यासाठी सोलापूर जिल्हा शंभर टक्के लसीकरणयुक्त झाला पाहिजे यासाठी प्रशासनाने योग्य ती दक्षता घ्यावी, असे आवाहन राज्याचे सार्वजनिक बांधकाम, मृद व जलसंधारण, सामान्य प्रशासन विभागाचे राज्यमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले.
जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात आयोजित कोविड-१९ आढावा बैठकीत पालकमंत्री भरणे बोलत होते.यावेळी महापालिका आयुक्त पी. शिवशंकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, सोलापूर शहर पोलीस आयुक्त कार्यालयाचे आयुक्त हरीश बैजल, अप्पर जिल्हाधिकारी संजीव जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शीतल कुमार जाधव जिल्हा नियोजन अधिकारी सर्जेराव दराडे,पोलीस उपाधीक्षक वैशाली कडूकर उपस्थित होते.
जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधात्मक लसी चा पहिला डोस घेतलेल्या नागरिकांची एकूण संख्या २२ लाख ८६ हजार३७५ इतकी असून, यामध्ये ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांची संख्या १८ लाख १२ हजार २६३ तर सोलापूर महानगर पलिका हद्दीतील नागरिकांची संख्या ४ लाख ७३ हजार ७५२ इतकी आहे तर दुसरा डोस घेतलेल्या एकूण नागरिकांची संख्या ७ लाख २२ हजार २९२ इतकी असून यामध्ये ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांची संख्या ४ लाख ९६ हजार ३४६ इतकी असून सोलापूर महानगर पालिका हद्दीतील नागरिकांची संख्या २ लाख २५ हजार ९४६ इतकी आहे. तसेच दोन्ही डोस घेतलेल्या जिल्ह्यातील नागरिकांची एकूण संख्या ३० लाख ८ हजार ६६७ इतकी असून यामध्ये ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांची संख्या २३ लाख ८ हजार ९६९ इतकी तर सोलापूर महानगर पालिका हद्दीतील नागरिकांची संख्या ६ लाख ९९ हजार ६९८ इतकी असली तरी जिल्हा प्रशासनाने अधिक मोठ्या प्रमाणावर लसीकरण मोहीम राबवून जिल्ह्यातील एक ही नागरिक लसीकरणापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी, असे निर्देश पालकमंत्री भरणे यांनी दिले.
आज रोजी कोरोना रुग्णसंख्या कमी होत असली तरी जिल्ह्यातून कोरोनाचा पूर्णपणे नायनाट झालेला नाही. त्यामुळे नागरिकांनीही कोरोना प्रतिबंधासाठी योग्य ती दक्षता घ्यावी. तसेच जिल्ह्यात प्रशासनाने उपलब्ध करून दिलेल्या लसीकरण केंद्रावर जाऊन आपले स्वतःचे व आपल्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीचे लसीकरण करून घ्यावे असे आवाहन पालकमंत्री भरणे यांनी यावेळी केले.
प्रारंभी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर जाधव यांनी सोलापूर जिल्ह्यात आज रोजी १२९ कोरोना अक्टिव्ह रुग्णसंख्या आज असून रुग्णालयातून डिस्चार्ज दिलेल्या रुग्णांची संख्या ३३ इतकी असल्याचे माहिती देऊन आज रोजी एकूण १७५७ कोरोना चाचणी केली असून त्यात २४ कोरोना बाधित आढळल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच आरोग्य यंत्रणा संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर पूर्णपणे सज्ज असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.