बारावीसाठी ५५ हजार ८७९ व दहावीसाठी ६५ हजार ५८५ इतके विद्यार्थी प्रविष्ठ

कॉपीमुक्त अभियानाची कडक अंमलबजावणी; सर्व ती आवश्यक यंत्रणेचा वापर करावा

कन्या न्यूज नेटवर्क ||

सोलापूर  : फेब्रुवारी मार्च २०२५ मध्ये होणाऱ्या माध्यमिक दहावी व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र बारावी शालांत प्रमाणपत्र परीक्षेसाठी दक्षता समितीची सभा जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा दक्षता समिती, सोलापूर यांच्या अध्यक्षतेखाली व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, सोलापूर यांच्या उपस्थितीत बुधवार, दि. ५ फेब्रुवारी २०२५ रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, सात रस्ता, सोलापूर येथे पार पडली.

सदर बैठकीमध्ये शिक्षणाधिकारी (माध्यमिक) जिल्हा परिषद, सोलापूर तथा सचिव जिल्हा दक्षता समिती यांनी जिल्ह्यामध्ये बारावीची १२१ व दहावीची १८४ परीक्षा केंद्रे आहेत.   सदर परीक्षेसाठी जिल्ह्यात बारावी,  अकरावी व दहावीसाठी १४ परिरक्षक केंद्र (कस्टडी) आहेत. त्यावर गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. या परीक्षांसाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिवांनी दि. ३ फेब्रुवारी २०२५ रोजी झालेल्या राज्यस्तरीय व्ही.सी.मध्ये १९८२ च्या कायद्याची कॉपीमुक्त अभियानाची कडक अंमलबजावणी करण्यासाठी सर्व ती आवश्यक यंत्रणेचा वापर करावा.  याबाबत निर्णय घेण्याचे अधिकार जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहेत.

बारावीची परीक्षा दि. ११ फेब्रुवारी २०२५  ते १८ मार्च २०२५ या कालावधीत आयोजित करण्यात आलेली आहे. तसेच  दहावीची परीक्षा दि. २१ फेब्रुवारी २०२५ ते दि.१७ मार्च २०२५ या कालावधीत आयोजित करण्यात आलेली आहे.

  • बारावीसाठी ५५ हजार ८७९ व दहावीसाठी ६५ हजार ५८५ इतके विद्यार्थी प्रविष्ठ होत आहेत. सदर परीक्षा केंद्रांसाठी केंद्रसंचालक नियुक्ती करण्यात आलेले आहे. जिल्ह्यात  बारावीसाठी ३४  व इयत्ता  दहावीसाठी ४७ संवेदनशील केंद्रे आहेत, अशी माहिती शिक्षणाधिकारी (माध्यमिक) जिल्हा परिषद, सोलापूर यांनी बैठकीमध्ये दिली.

या परिक्षा केंद्रावर विशेष पोलीस बंदोबस्त व बैठे पथक नेमण्यात आलेले आहे. या परिसरात १४४ कलम लागू करण्याबाबत जिल्हाधिकारी यांनी पोलीस आयुक्त शहर व पोलीस अधीक्षक, ग्रामीणच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. संवेदनशील केंद्रावर व ज्याठिकाणी मास कॉपी चालते त्याठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून व्हिडीओग्राफीसाठी व्हिडीओग्राफर उपलब्ध करून देण्यात येतील असे सांगितले.

तालुकास्तरावर जिल्हाधिकारी यांच्यामार्फत तहसीलदार, नायब तहसीलदार यांच्याकडून फिरते पथक व बैठे पथक नियुक्त करण्यात येतील. त्यामध्ये ग्रामसेवक, तलाठी यांची व इतर आवश्यक अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात येईल. मुख्य कार्यकारी अधिकारी, यांच्यामार्फत जिल्हा परिषदेतील खाते प्रमुखांची फिरते पथकामध्ये नियुक्त करण्यात येईल.

संवेदनशील परीक्षा केंद्र अथवा गाव जेथे १४४ कलमाची कडकपणे अंमलबजावणी करण्यात येईल. गावातील प्रतिष्ठित ४ ते ५ लोकांचे संपर्क क्रमांक घेवून त्यांच्याकडून गावातील याबात माहिती घेतली जाईल. एका ठिकाणी कंट्रोल रूम तयार करण्यात येईल. त्याठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद विभाग, पोलीस विभाग व शिक्षण विभाग यांचे प्रतिनिधी नियुक्ती करण्यात येतील. यामार्फत जिल्ह्यातील सर्व परीक्षा केंद्रावर विशेषत: संवेदनशील केंद्रावर लक्ष ठेवण्यात येईल. ज्या परिक्षा केंद्रावर गैरकृत्य आढळून आल्यास फिरते पथकास व पोलीस विभागास माहिती दिली जाईल. संबंधितावर पुढील योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

परीक्षेच्या कालावधीत विद्यार्थ्यांसाठी विशेष आरोगय सेवा पुरविण्याबाबत जिल्हा आरोग्य अधिकारी यांना सूचना देण्यात आली. त्यादृष्टीने आवश्यक असलेल्या परीक्षा केंद्रावर बैठे आरोगय पथक व तालुक्यात एक फिरते आरोग्य पथक नियुक्त करण्यात यावे, असे जिल्हाधिकारी यांनी आदेश दिले.

या परीक्षांसाठी जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (डाएट), वेळापूर, शिक्षणाधिकारी माध्यमिक, प्राथमिक, योजना जिल्हा परिषद, सोलापूर यांचेही फिरते पथक सक्रीय राहील, अशा सूचना दिलेल्या आहेत. या दक्षता समितीच्या बैठकीसाठी जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस आयुक्त शहर व पोलीस अधिक्षक ग्रामीण यांचे प्रतिनिधी, प्राचार्य जिल्हा परिषद, उपशिक्षणाधिकारी माध्यमिक, सहा. शिक्षण उपनिरीक्षक उच्च माध्यमिक सोलापूर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

× Contact