१६ परिमंडलातील ११०० खेळाडूंचा सहभाग; दि. ५ ते ८ फेब्रुवारी दरम्यान होणार स्पर्धा
कन्या न्यूज नेटवर्क ||
बारामती : महावितरण कंपनीच्या राज्यस्तरीय आंतरपरिमंडलीय क्रीडा स्पर्धा बारामती येथे होणार आहेत. राज्यस्तरीय आंतरपरिमंडलीय क्रीडा स्पर्धा २०२४-२५ चे आयोजन बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या विद्यानगरी संकुलात दि. ५ ते ८ फेब्रुवारीदरम्यान करण्यात आले आहे. या स्पर्धेत १६ परिमंडलातील सुमारे ११०० खेळाडू सहभागी होणार आहेत.
वीज कर्मचाऱ्यांच्या क्रीडा कौशल्याला वाव देण्यासाठी महावितरणमध्ये दरवर्षी राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. सन २०२४-२५ च्या स्पर्धेचे यजमानपद बारामती परिमंडलाकडे आहे. या स्पर्धेचे उद्घाटन बुधवारी (दि. ५) सकाळी ९ वाजता महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संचालक (संचालन/मानव संसाधन) अरविंद भादीकर राहतील.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक विभागाचे सह व्यवस्थापकीय संचालक राहुल गुप्ता, कोकण प्रादेशिक विभागाचे सहव्यवस्थापकीय संचालक दिलीप जगदाळे, संचालक (वित्त) अनुदीप दिघे, संचालक (प्रकल्प) प्रसाद रेशमे, संचालक (वाणिज्य) योगेश गडकरी, नागपूर प्रादेशिक संचालक परेश भागवत, पुणे प्रादेशिक संचालक व आयोजन समितीचे अध्यक्ष भुजंग खंदारे, स्पर्धेचे मुख्य समन्वयक तथा मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी संजय ढोके उपस्थित राहणार आहेत.
या स्पर्धेत क्रिकेट, बॅडमिंटन, टेबल टेनिस, टेनिक्वाईट, कॅरम, कबड्डी, व्हॉलीबॉल, खो-खो, ॲथलेटिक्स, कॅरम आणि ब्रिज आदी २२ क्रीडा प्रकारांचा समावेश आहे. वैयक्तिक, सांघिक आणि सर्वसाधारण या तिन्ही प्रकारात विजेत्यांना पारितोषिके दिली जाणार आहेत.
क्रीडा स्पर्धेचा पारितोषिक वितरण कार्यक्रम शनिवारी (दि. ८ फेब्रुवारी) दुपारी ३.३० वाजता विद्या प्रतिष्ठानच्या गदिमा सभागृहात संचालक (संचालन/मानव संसाधन) अरविंद भादीकर यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुणे प्रादेशिक संचालक भुजंग खंदारे राहणार आहेत.
स्पर्धेच्या आयोजनासाठी मुख्य अभियंता व आयोजन समितीचे कार्याध्यक्ष धर्मराज पेठकर, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी व आयोजन समितीचे सचिव श्रीकृष्ण वायदंडे, विविध समित्या पुढाकार घेत आहेत.