टर्की (मानवगट) येथे होणार आंतरराष्ट्रीय स्पर्धा
कन्या न्यूज नेटवर्क ||
सोलापूर : सोलापूरच्या संध्याराणी गणेशराज बंडगर यांची भारतीय लॉन टेनिस संघात निवड झाली आहे. दि. ९ ते १४ मार्च २०२५ या कालावधीत टर्की (मानवगट) येथे होणा-या आंतरराष्ट्रीय टेनिस फेडरेशनने आयोजित केलेल्या मास्टर वर्ल्ड टूर टीम चैम्पियनशिप स्पर्धेत भारतातर्फे सहभागी होणा-या ४० वर्षापुढील वयोगटातील महिलांच्या संघात निवड झालेली आहे.
संध्याराणी बंडगर यांनी २०२४ मधे आंतरराष्ट्रीय टेनिस फेडरेशनने सोलापूर, झज्जर (हरियाणा) व इंदौर येथे आयोजित केलेल्या स्पर्धेत सहभाग नोंदवून विजेतेपद, उपविजेतेपद पटकावले होते. त्यांच्या या यशामुळे त्यांच्या वैयक्तिक गुणात वाढ होऊन त्यांनी त्यांच्या वयोगटात प्रथम मानांकन प्राप्त केले होते.
संध्याराणी या विभागीय वन अधिकारी, सामाजिक वनीकरण खात्यात मुख्य लेखापाल पदावर कार्यरत आहेत. त्यांना मनिषा पाटील (डीएफओ) यांचे सहकार्य लाभत आहे. त्यांना महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटनेचे संयुक्त सचिव राजीव देसाई यांचे मार्गदर्शन लाभले. सुधीर सालगुडे हे त्यांचे प्रशिक्षक आहेत. त्यांच्या या निवडीबद्दल सोलापूर जिल्हा लॉन टेनिस संघटनेचे अध्यक्ष राजेश दमाणी, संघटनेचे सहसचिव पंकज शहा, कोषाध्यक्ष दिलीप अत्रे, दिलीप बचुवार यांनी अभिनंदन केले आहे.