सोलापूर विद्यापीठात आंतरराष्ट्रीय तृतीयपंथीय परिषदेचा समारोप

कन्या न्यूज नेटवर्क ||

सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने महाराष्ट्रात प्रथमच तृतीयपंथीयांच्या समस्येवर आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करून एका वेगळ्या विषयाला स्पर्श केले. त्यांच्या समस्येवर मंथन करण्याबरोबरच त्यांच्याविषयी एक आपुलकीची भावना दाखवत समाज जागृतीचे महत्त्वपूर्ण कार्य केले. याचा आदर्श राज्यातील इतर विद्यापीठांनी घेण्याबरोबरच माणूस म्हणून प्रत्येकानी तृतीयपंथीयांविषयी आपुलकीची भावना ठेवावी, असे आवाहन महाराष्ट्र तृतीयपंथीय कल्याणकारी मंडळाच्या सदस्या शमिबा पाटील यांनी केले.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील सामाजिकशास्त्रे संकुल आणि समाजसेवक ब्रिजमोहन फोफलीया यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यापीठात आयोजित दोन दिवसीय तृतीयपंथीयांच्या आंतरराष्ट्रीय परिषदेचा समारोप शमीबा पाटील यांच्या प्रमुख उपस्थित झाला. यावेळी त्या बोलत होत्या.   अध्यक्षस्थानी कुलगुरू प्रा. डॉ. प्रकाश महानवर हे होते. यावेळी प्र-कुलगुरू प्रा. लक्ष्मीकांत दामा, कुलसचिव योगिनी घारे, समाजसेवक ब्रिजमोहन फोफलीया, सामाजिकशास्त्रे संकुलाचे संचालक डॉ. गौतम कांबळे, कौशल्य विभागाचे संचालक डॉ. प्रभाकर कोळेकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.

शमिबा पाटील म्हणाल्या…

आज समाजात तृतीयपंथीयांविषयी दुजाभाव केला जातो. वास्तविक त्यांच्याकडे संवेदनशीलतेने पाहण्याची गरज आहे. संघर्षमय जीवन जगताना त्यांच्या अनेक समस्या असतात. त्या सोडवण्याबरोबरच त्यांच्याविषयी प्रत्येकाच्या मनात आपुलकीची भावना निर्माण होणे आवश्यक आहे. तृतीयपंथी ऐवजी पारलिंगी हा शब्द वापरला पाहिजे. त्यांच्याविषयी गैरसमज व भेदभाव न करता माणुसकीची भावना ठेवून नेहमी मदत करावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

 

कुलगुरू प्रा. महानवर म्हणाले…

  • पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील सामाजिकशास्त्रे संकुल व ब्रिजमोहन फोफलिया यांच्या टीमने यशस्वीरित्या तृतीयपंथीय आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन केले. अभ्यासक व संशोधकांनी यात शोधनिबंध सादर केले. प्रत्यक्ष तृतीयपंथीदेखील यात सहभागी झाले. भविष्यकाळात देखील विद्यापीठाकडून तृतीयपंथीयांसाठी सुविधा केंद्र, शिक्षणाची सोय आदी उपक्रम राबविण्यात येईल, असे ही त्यांनी यावेळी सागितले.

यावेळी प्र-कुलगुरू प्रा. लक्ष्मीकांत दामा, समाजसेवक ब्रिजमोहन फोफलीया, डॉ. गौतम कांबळे, डॉ. प्रभाकर कोळेकर आदींनीही आपले मनोगत व्यक्त केले.  सूत्रसंचालन डॉ. तेजस्विनी कांबळे, आभार प्रदर्शन डॉ. अंबादास भासके यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

× Contact