उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर; प्राणी क्लेष प्रतिबंधक कायद्याची जिल्ह्यात प्रभावीपणे अंमलबजावणी करावी
कन्या न्यूज नेटवर्क ||
सोलापूर : महाराष्ट्र प्राणी रक्षण कायदा २०२१५ प्राणी क्लेष कायदा १९६० वाहतूक नियममधील तरतुदीचे पालन करणे गरजेचे असून, प्राण्यांना क्रुरतेने वागविण्यास प्रतिबंध आहे. बैलगाडीतून साखर कारखान्याकडे ऊस वाहतूक करताना बैलांवर होणाऱ्या क्रुरतेस प्रतिबंध आहे. तरी सर्व संबंधित शासकीय यंत्रणेने जिल्ह्यात प्राणी क्लेश कायद्याच्या नियमांची अंमलबजावणी करून सुव्यवस्था राखण्याच्या सुचना उपजिल्हाधिकारी महसूल अमृत नाटेकर यांनी जिल्हा प्राणी क्लेष प्रतिबंधक समितीची बैठकीत दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालय, सोलापूर येथे जिल्हा प्राणी क्लेष प्रतिबंधक समितीची बैठक घेण्यात आली. यावेळी जिल्हा वन अधिकारी कार्यालयाचे गोवर्धन चोपडे, महानगरपालिकेचे डॉ. सतिश चौगुले, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय पाटील, उपशिक्षणाधिकारी स्वाती हवेले, पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे, पोलीस निरिक्षक बाळासाहेब भरणे, जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. विशाल येवले, प्रादेशिक सहसंचालक (साखर) सोलापूर विभागाचे आर. एस. राठोड, इंदेश्वर शुगर बार्शीचे व्यवस्थापकीय संचालक ए. एस. जाधव आदी उपस्थित होते.
प्राण्यांना क्रूरतेने वागविण्यास प्रतिबंध करण्याबाबत प्राण्यांची पायी वाहतूक नियम २००१ या कायदा व नियमांच्या तरतुदींचे काटेकोरपणे पालन केल्याखेरीज जनावरांची वाहतूक करण्यात येऊ नये. सदर अधिनियमातील कलम ११ (१) (क) नुसार कोणत्याही व्यक्ती कोणत्याही प्राण्यांला मारणे, त्याच्यावर अधिक भार लादणे, प्राण्यांना क्रुरतेने अधिक दामटणे, त्याच्या वर क्षमतेपेक्षा जास्त वजन वजनांचा भार देणे, त्यांच्या छळ करणे किंवा त्या प्राण्यांना उगीच वेदना व यातना होतील अश्या बाबींच्या विषयी दंड व कारावासाची शास्ती नमूद आहे.
प्राण्यांना क्रुरतेने वागविण्यास प्रतिबंध करण्याबाबत अधिनियम १९६० या मसुदा आणि पॅक १९६५ च्या नियम ६ नुसार जनावरांना दिवसभरातून नऊ तासाहून अधिक काळ वाहतूक करु देऊ नये. तापमान ३७ अंश सेल्सियसपेक्षा जास्त असेल अश्या ठिकाणी दुपारी १२ ते ३ या वेळेमध्ये विश्रांती देण्यात यावी, अशा सुचनाही बैठकीत दिल्या.
प्राण्यांना कुरतेने वागविण्यास प्रतिबंध करण्याबाबत अधिनियम १९६० या कायद्यांतर्गत प्राण्यांची पायी वाहतूक नियम २००१ च्या नियम १२ नुसार सुर्योदयापूर्वी किंवा सुर्यास्तानंतर कोणत्याही व्यक्तीने जनावरांची पायी ने-आण करु नये तसेच जनावरे (बैल) ३० किमी किंवा ८ तास व खाण्यापिण्यासाठी ४ किलोमीटर प्रती २ तास यापलीकडे प्राण्याची पायी ने-आण करता येणार नाही, असे अधिसूचित केले आहे.तसेच बैलगाडा शर्यतीचे आयोजन करताना परवानगी घेऊन करावी. विना परवानगी शर्यतीचे आयोजन करु नये असे आवाहनही उपजिल्हाधिकारी (महसूल) अमृत नाटेकर यांनी केले आहे.