आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धा : स्वरलक्ष्मी नायर, प्रथमेश शेरला यांना आंतरराष्ट्रीय कँडिडेट मास्टर पदवी
कन्या न्यूज नेटवर्क ||
सोलापूर : मदुराई येथे नुकत्याच झालेल्या आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत सोलापूर चेस अकॅडमीच्या तेरा वर्षीय आंतरराष्ट्रीय गुणांकन प्राप्त मानस गायकवाड याने उत्कृष्ट खेळ करीत दहापैकी साडेसहा गुण प्राप्त केले. २१०० पेक्षा कमी रेटिंग गटात तृतीय क्रमांक प्राप्त करीत ४० हजार रुपयांचे रोख पारितोषिक पटकाविले. चेन्नई येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत तेरा वर्षाखालील राष्ट्रीय विजेत्या विरेश शरणार्थी याने देखील नेत्रदिपक कामगिरी करीत दहापैकी सहा गुण प्राप्त आपल्या आंतरराष्ट्रीय गुणांकनात ९८ गुणांची वाढ करीत कॅटेगरी गटात द्वितीय क्रमांकासह आठ हजार रुपयांचे बक्षीस मिळविले.
स्पेन, फ्रांस येथे नुकत्याच झालेल्या आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत स्वरलक्ष्मी नायर हिनेदेखील आंतरराष्ट्रीय गुणांकनात २४० गुणांच्या वाढीसह महिला कँडिडेट मास्टरचा निकष पूर्ण करीत उल्लेखनीय कामगिरी केली. तेरा वर्षांखालील महाराष्ट्र राज्य विजेता प्रथमेश शेरलाने १५ व १३ वर्षाखालील राष्ट्रीय स्पर्धेत उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करीत अनुक्रमे तिसरे व दुसरे स्थान पटकावले. त्याने ११ फेऱ्यांपैकी ९ गुण मिळवले. ज्यामध्ये त्याने सध्याचा सब-ज्युनियर चॅम्पियन आंतरराष्ट्रीय मास्टर इलमपारथी ए.आर. (रेटिंग-२४५७), माजी ११ वर्षाखालील राष्ट्रीय विजेता फिडे मास्टर जी. आकाश यांच्यावर प्रभावी विजय मिळवत आयएम वाझ एथन (रेटिंग: २३७०) यांच्याशी बरोबरी साधली. त्याला १५ वर्षाखालील गटात रोख बक्षीस म्हणून ५८ हजार रुपयांचे बक्षीस, १३ वर्षाखालील गटात ६० हजार रुपये आणि आकर्षक ट्रॉफी मिळाली. त्याने १६७ एलो गुण मिळवत फिडे यादीत २२०० एलो रेटिंगचा निकष पूर्ण करीत कँडिडेट मास्टरचा पदवी प्राप्त केली. आगामी आशियाई आणि जागतिक युवा स्पर्धेत प्रथमेश भारताचे प्रतिनिधित्वदेखील करेल. वागीश स्वामिनाथन याने बिलो १८०० गुणांकन स्पर्धेत चमकदार कामगीरी करीत १३ वर्षाखालील गटात तिसरा क्रमांक मिळवीत सायकल पारितोषिक पटकाविले.
मदुराई येथील स्पर्धत भारतासह रशिया, अमेरिका, फ्रान्स, हंगेरी, इंडोनेशिया, कझाकिस्तान, मंगोलिया आदी २२ देशांतील १५९ अव्वल खेळाडूंनी सहभाग नोंदविला होता. सोलापूरच्या मानसने स्पर्धेत आकर्षक खेळ करत इंडोनेशियाची वुमन इंटरनॅशनल मास्टर डायजेंग थेरेसा, ओरिसाचा श्रेयांश पटनायक तमिळनाडूचा फिडे मास्टर राम अरविंद, कॅन्डीडेट मास्टर भरत कल्याण, वेस्ट बंगालचा फिडे मास्टर सौरथ विश्वास, तेलंगणाचा फिडे मास्टर के. रामू यांना पराभूत केले. रशियाच्या आंतरराष्ट्रीय मास्टर स्लिझेव्हस्की अलेक्झांडरचा डाव बरोबरीत सोडविला. मानसने त्याच्या आंतरराष्ट्रीय गुणांकनात १४३ गुणांनी वाढ केली. स्पर्धेत आंतरराष्ट्रीय मातब्बर खेळाडूंच्या सहभागामुळे पहिल्या फेरीपासूनच विजेतेपदासाठी जोरदार रस्सीखेच पहावयास मिळाली.
स्पेनच्या सनवे सीजेस आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महोत्सवात स्वरलक्ष्मीने आपल्या खेळाची चुणूक दाखवत मेक्सिकोच्या आंतरराष्ट्रीय मास्टर लुईस कार्लोसविरुद्ध पोलंडच्या फिडे मास्टर प्निक्झेक मरेक, जर्मनीचा ग्रँडमास्टर वोग्ट लोथर यांच्याशी बरोबरी साधली. अमेरिकेच्या हरीश नीरज, अझरबैजानच्या महिला आंतरराष्ट्रीय मास्टर इब्राहिमोवा सबिना, स्पेनच्या फिडे मास्टर जोस रॅमनविरुद्ध सुरेख खेळ करीत विजय प्राप्त केला. या स्पर्धेत ४२ देशातील ग्रँडमास्टर, आंतरराष्ट्रीय मास्टर यांच्यासह एकूण २६७ मानांकित खेळाडूंनी सहभाग नोंदविला होता. विरेशने ग्रँडमस्टर श्याम निखील, ग्रँडमास्टर शामसुंदर तसेच किर्गिस्तान व मंगोलियाच्या आंतरराष्ट्रीय मास्टर टोलोगॉन सेमेटीव अजिबिलेग उर्तसैख यांच्याशी बरोबरी साधली.
बुद्धिबळ या खेळामध्ये आंतरराष्ट्रीय कँडिडेट मास्टर ही पदवी आहे. ही पदवी जागतिक बुद्धिबळ संघटने मार्फत दिली जाते. एखाद्या खेळाडूने आंतरराष्ट्रीय स्तरावर २२०० किंवा त्यापेक्षा अधिक क्लासिकल रेटिंग मिळवल्यास तर महिलांसाठी २००० चे क्लासिकल रेटिंग प्राप्त करून ही पदवी प्राप्त होते. मानस, विरेश, प्रथमेश, स्वरलक्ष्मी, वागीश यांना सोलापूरचे आंतरराष्ट्रीय पंच व नामवंत राष्ट्रीय प्रशिक्षक सुमुख गायकवाड, आंतरराष्ट्रीय गुणांकन प्राप्त उदय वगरे यांचे मार्गदर्शन लाभले. ग्रँडमास्टर अभिजित कुंटे, आंतरराष्ट्रीय मास्टर अनुप देशमुख, द्रोणाचार्य पुरस्कार प्राप्त रघुनंदन गोखले यांचेदेखील विशेष मार्गदर्शन लाभले.
खेळाडूंनी मिळविलेल्या उल्लेखनीय यशाबद्दल सोलापूर डिस्ट्रिक डीस्ट्रीक्ट चेस असोसिएशनचे अध्यक्ष खा. धैर्यशील मोहिते-पाटील, सोलापूर चेस अकॅडेमीचे अध्यक्ष महेश धाराशीवकर, सचिव सुमुख गायकवाड, नामवंत उद्योजक रविंद्र जयवंत, अतुल कुलकर्णी, नितीन काटकर, गोपाळ राठोड, संतोष पाटील, प्रशांत गांगजी, दिपाली पुजारी, गणेश मस्कले, निहार कुलकर्णी, विजय पंगुडवाले, प्रशांत पिसे, जयश्री कोंडा, रोहिणी तुम्मा, नागेश पाटील, विशाल पटवर्धन, रोहित पवार, श्रेयांस शहा, चंद्रशेखर कोरवी, युवराज पोगुल आदींनी अभिनंदन केले. ग्रँडमास्टर अभिजित कुंटे, अशोक भाऊ जैन, महाराष्ट्र चेस असोसिएशनचे सचिव निरंजन गोडबोले, अध्यक्ष परिणय फुके यांनीदेखील कौतुक करत शुभेच्छा दिल्या.