अक्षता सोहळा कार्यक्रम स्थानिक केबल नेटवर्कद्वारे लाईव्ह दाखवण्यात येणार

कन्या न्यूज नेटवर्क ||

सोलापूर : श्री सिद्धेश्वर महायात्रा दि. १२ ते १६ जानेवारी २०२५ या कालावधीत आहे. सर्व संबंधित शासकीय विभाग, देवस्थान पंच कमिटी यांना कृती आराखड्याप्रमाणे सोपवलेल्या कामकाजाचा सविस्तर आढावा जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी घेऊन यात्रा कालावधीत भाविकांना सर्व प्रकारच्या सुविधा सहज व सुलभ रीतीने उपलब्ध करून द्याव्यात, असे निर्देश दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातील व्हीआयपी सभागृहात आयोजित श्री सिद्धेश्वर महायात्रा २०२५ अंतर्गत पूर्वतयारी आढावा बैठकीत जिल्हाधिकारी बोलत होते.

यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी मनिषा कुंभार, पोलीस उपआयुक्त दिपाली काळे, महापालिका अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे,  सोलापूर महानगरपालिकेच्या अभियंता  अकुलवार, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शक्ती सागर ढोले, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहायक अभियंता विशाल लेंगरे, महानगरपालिकेचे व सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी, देवस्थान पंच कमिटीचे सदस्य उपस्थित होते.

    जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी श्री सिद्धेश्वर महायात्रा २०२५ च्या अनुषंगाने राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायद्यातील नियमावलीप्रमाणे सर्व संबंधित विभागाच्या जबाबदारी प्रमाणे कृती आराखडा तयार करण्यात आलेला आहे. त्यानुसार सर्व संबंधित विभागानी त्यांची जबाबदारी अत्यंत काटेकोरपणे पार पाडावी. यात्रा कालावधीत येणाऱ्या हजारो भाविकांना कोणत्याही प्रकारच्या अडथळ्याशिवाय सहज दर्शन व्हावे. मनोरंजन नगरीमध्ये त्यांना सहभाग घेता येईल, याबाबत काळजी घ्यावी. मनोरंजन नगरीमध्ये नागरिकांना धुळीचा त्रास होणार नाही, या अनुषंगानेही महानगरपालिका व देवस्थान कमिटी यांनी योग्य उपाय योजना कराव्यात, असेही त्यांनी सूचित केले.

निवासी उपजिल्हाधिकारी मनिषा कुंभार यांनी श्री सिद्धेश्वर महायात्रा यशस्वी होण्यासाठी प्रत्येक विभागावर सोपविण्यात आलेली जबाबदारी, त्यांनी आत्तापर्यंत केलेल्या कामकाजाची माहिती बैठकीत सादर केली. 

  • श्री सिद्धेश्वर महायात्रा दि. १२ ते १६ जानेवारी २०२५ या कालावधीत होत आहे. दि. १२ जानेवारी रोजी ६८ लिंग प्रदर्शन, दि. १३ जानेवारी रोजी अक्षता कार्यक्रम, दि. १४ जानेवारी होमहवन असे कार्यक्रम होणार असल्याची माहिती मंदीर समिती यांनी दिली.
  • मंदिर समितीच्यावतीने दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या सोयी सुविधांची माहिती दिली.
  • समितीच्यावतीने जवळपास १५० स्वयंसेवक पोलिसांच्या मदतीसाठी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
  • अक्षता सोहळा कार्यक्रम जास्तीत जास्त भाविकांना पाहता यावा, यासाठी समितीच्यावतीने एलईडी स्क्रीन जागोजागी उपलब्ध करून देण्यात येत आहेत.
  • स्थानिक केबल नेटवर्कद्वारे हा कार्यक्रम लाईव्ह दाखवण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

× Contact