प. पू. स्वामी गोविंद देव गिरीजी : छत्रपती श्री शिवाजी महाराज कथा

कन्या न्यूज नेटवर्क ||

सोलापूर :  छत्रपती श्री शिवरायांसाठी आपल्या प्राणांचे बलिदान देणाऱ्या बाजीप्रभू देशपांडे आणि शिवा काशीद यांच्यासारख्या वीरांमुळे पावनखिंड हे भारतीय राष्ट्रीय स्वातंत्र्याचे तीर्थक्षेत्र बनले, असे प्रतिपादन छत्रपती श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र अयोध्याचे कोषाध्यक्ष प. पू. स्वामी गोविंद देव गिरीजी यांनी केले.

३५० व्या श्री शिवराज्याभिषेक वर्षानिमित्त समस्त हिंदू समाजातर्फे जुनी मिल कंपाउंड येथील नागेश करजगी ऑर्किड स्कूलमध्ये २५ सप्टेंबरपर्यंत आयोजित छत्रपती श्री शिवाजी महाराज कथेच्या चौथ्या दिवशी रविवारी प. पू. स्वामी गोविंद देव गिरिजी यांनी मार्गदर्शन केले. ‘शिवधैर्य’ या विषयावर बोलताना त्यांनी पन्हाळगडाचा वेढा, पावनखिंडीतील शौर्य, चाकणचा रणसंग्राम, लाल महालावर छापा आणि शाहिस्तेखानावर मात आदींवर विवेचन केले.

प. पू. स्वामी गोविंद देव गिरिजी म्हणाले, निस्वार्थ भूमिकेतून जिथे धर्मयोद्धे आपले प्राण देव, देश, धर्मासाठी अर्पण करतात तिथे राष्ट्रीय तीर्थ निर्माण होते. प्रत्येकाने ऊर्जा घेण्यासाठी अशा ठिकाणी जावे.

संभाव्य संकटांचा अंदाज घेऊन त्यावर मात करण्यासाठी अचूक योजना आखण्याची विलक्षण क्षमता श्री शिवछत्रपतींमध्ये होती. त्यांचाच आदर्श घेऊन प्रत्येक हिंदूने जात, भाषा, संप्रदाय विसरून ‘हिंदू सारा एक’ हा मंत्र अंगी भिनवला पाहिजे, असेही प. पू. स्वामी गोविंद देव गिरिजी यांनी सांगितले.श्रीलंका ते भारत सलग १० तास २५ मिनिटे पोहून सोलापूरच्या कीर्ती भराडिया यांनी केलेल्या विश्वविक्रमाबद्दल त्यांचा प. पू. स्वामी गोविंद देव गिरिजी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक सी. ए. राजगोपाल मिणीयार यांनी तर सूत्रसंचालन गुरुशांत धुत्तरगावकर यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

× Contact