कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या १३७ व्या जयंतीचे औचित्य साधून

सलग ७ तास ७ मिनिट ७ सेकंद २ हातानी २ दांडपट्टा (राज्यशस्त्र) चालविणार

कन्या न्यूज नेटवर्क ||

सोलापूर : कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या १३७ व्या जयंतीनिमित्त ट्रॅडिशनल  दांडपट्टा  स्पोर्ट्स असोशियन (महाराष्ट्र) व रयत शिक्षण संस्था संचलित नरसिंह विद्यालय (कर्दळी, दक्षिण सोलापूर) यांच्या संयुक्त विद्यमाने  रविवार, दि. २२ सप्टेंबर २०२४ रोजी  तेरा वर्षीय विद्यार्थी छत्रवीर पवार   दांडपट्टा चालविण्याचा अनोखा विक्रम करणार आहे, अशी माहिती ट्रॅडिशनल दांडपट्टा स्पोर्ट्स असोसिएशनचे अध्यक्ष शिवराम भोसले व सचिव अश्विन काडलासकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

रविवार, दि. २२ सप्टेंबर २०२४ रोजी  सकाळी सात वाजता या उपक्रमाची सुरुवात होणार असून, दुपारी दोन वाजेपर्यंत हा विश्वविक्रम असणार आहे. नरसिंह विद्यालयातील विद्यार्थी छत्रवीर कृष्णा पवार हा तेरा वर्षीय बालक कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या १३७ व्या जयंतीचे औचित्य साधून सलग ७ तास ७ मिनिट ७ सेकंद २ हातानी २ दांडपट्टा (राज्यशस्त्र) चालविणार आहे.  तो सदरचा आगळावेगळा उपक्रम करीत छत्रपती शिवाजी महाराज व कर्मवीर भाऊराव पाटील यांना अभिवादन करणार आहे.

छत्रवीर पवार यांने गेल्या वर्षी सिंदखेडराजा या ठिकाणी एका हाताने एक दांडपट्टा सलग साडेपाच तास चालवून विश्वविक्रम केला होता. यावर्षी तो सलग दोन हाताने दोन दांडपट्टे सलग सात तास चालवण्याचा विश्वविक्रम करणार आहे. मागील तीन महिन्यापासून छत्रवीर पवार हा सातत्याने याचा सराव प्रशिक्षक व  ट्रॅडिशनल दांडपट्टा स्पोर्ट्स असोसिएशनचे सचिव अश्विन कडलासकर व उपाध्यक्ष अंजना कडलासकर, ट्रॅडिशनल दांडपट्टा स्पोर्ट्स असोसिएशनचे अध्यक्ष शिवराम भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहे.

या उपक्रमास रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन संजीव पाटील यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.  नरसिंह विद्यालयाचे मुख्याध्यापक बाबुराव बिराजदार, वर्गशिक्षक संजीव अक्कलकोटे, सहशिक्षक भारत केत,  स्कूल कमिटी चेअरमन नानासाहेब सावंत यांचे सहकार्य लाभत आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, ट्रॅडिशनल दांडपट्टा स्पोर्ट्स इंटरनॅशनल फेडरेशनचे सुभाष मोहिते, ट्रॅडिशनल दांडपट्टा स्पोर्ट्स असोसिएशन इंडियाचे अध्यक्ष अजय आर शहा, ट्रॅडिशनल दांडपट्टा स्पोर्ट्स असोसिएशन इंडियाचे उपाध्यक्ष म. रफी शेख   उपस्थित  राहणार आहेत. या पत्रकार परिषदेस छत्रवीर पवार, छत्रवीरचे वडील कृष्णा पवार, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सोमनाथ राऊत, मुख्याद्यापक बाबुराव बिराजदार आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

× Contact