स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेतर्फे आयोजन
कन्या न्यूज नेटवर्क ||
सोलापूर : ग्रामीण विकास मंत्रालय भारत सरकार, राज्य सरकार व बँक ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामीण भागातील सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींना मोफत व्यवसाय प्रशिक्षण देवून उद्योग व्यवसायाकडे वळविण्याच्या हेतूने स्टार स्वंयरोजगर प्रशिक्षण संस्था सोलापूर यांच्यामार्फत मोफत विविध प्रशिक्षणांचे आयोजन करण्यात आले असून, ग्रामीण भागातील युवक-युवतींनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेचे संचालक दीपक वाडेवाले यांनी केले आहे.
स्टार स्वंयरोजगर प्रशिक्षण संस्था सोलापूर यांच्यामार्फत यावर्षी जवळपास ४० प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केले असून, सर्व प्रशिक्षण मोफत निवासी स्वरुपाचे असणार आहेत. यामध्ये शिवणकला, ब्युटीपार्लर, ज्वेलरी बनविणे, फास्ट फूड, दुचाकी दुरुस्ती, मोबाईल दुरुस्ती, शेळीपालन, दुग्धव्यवसाय व गांडूळ खतनिर्मिती, रेशीम उद्योग अशा विविध ६१ प्रकारचे व्यवसाय प्रशिक्षण दिले जाणार आहे. या सर्व प्रशिक्षणामध्ये उद्योजकता विकास, आर्थिक साक्षरता, बँकिंग तसेच प्रकल्प अहवाल या विषयावर मार्गदर्शन केले जाते. सर्व प्रशिक्षणासाठी लागणारे साहित्य, प्रशिक्षणार्थ्यांची राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था पुर्णपणे मोफत आहे. या प्रशिक्षणासाठी प्रशिक्षणार्थी हा सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील असावा. त्याचे वय १८ वर्षे पूर्ण आणि ४५ वर्षाच्या आतील असावे.
तरी जिल्हातील सर्व ग्रामीण भागातील युवक युवतींनी या संधीचा लाभ घेवून स्वतःचा व्यवसाय सुरू करावा व बेरोजगारी कमी करून देशाच्या आर्थिक वाटचालीसाठी हातभार लावावा, असे अवाहनही संस्थेचे संचालक वाडेवाले यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी (९२७२२०७१११) या भ्रमणध्वनीवर संपर्क करावा, असे आवाहन केले आहे.