विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन
by kanya news ||
सोलापूर : आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघ इस्कॉन सोलापूरच्यावतीने श्रीकृष्ण जन्माष्टमी महामहोत्सव सोहळा दि. २६ ऑगस्ट आणि मंगळवार, दि. २७ ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आलेला आहे, अशी माहिती इस्कॉन सोलापूरचे अध्यक्ष श्रीमान कृष्णभक्त प्रभू यांनी पत्रकार परिषदेत दिली.
ज्यावेळी भगवान श्रीकृष्ण कंसाच्या कारागृहात प्रकट झाले, याप्रमाणे संपूर्ण कारागृह प्रकाशित झाला आणि अंधकार नष्ट झाला. त्याच पद्धतीने भगवान श्रीकृष्ण जेव्हा या पृथ्वीतलावर आमच्या हृदयामध्ये वास असतात, त्यावेळी अज्ञानरुपी अंधकार नष्ट होऊन आपल्या जीवनात दिव्य ज्ञान आणि आनंद प्रदान करतात. इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष्णा कन्सिअसनेस- श्री श्री राधा दामोदर वेदिक कल्चरल सेंटर अक्कलकोट रोडच्यावतीने दोन दिवस हा उत्सव मोठ्या उत्साहाने आणि भक्तीपूर्ण वातावरणात साजरा केला जाणार आहे.
सोमवार, दि २६ ऑगस्ट २०२४ रोजी पहाटे ४.३० वाजता काकडा आरतीला सुरुवात होईल. तुलसी अर्चनानंतर सकाळी १० वाजता विष्णू सुदर्शन महायज्ञ आयोजित करण्यात आलेला आहे.सायंकाळी ५ ते १० या वेळेमध्ये भाजन, कीर्तन, सर्व यजमानांच्याद्वारे श्री श्री राधा-कृष्णांचा कलश महाआरती करण्यात येईल. त्यानंतर कृष्ण-कथा आणि रात्री १२ वाजता कृष्णजन्मोत्सव सोहळा, महाआरती आणि भगवंताना ५६ भोग अर्पण करण्यात येतील.
मंगळवार, दि. २७ ऑगस्ट २०२४ रोजी आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघाचे संस्थापकाचार्य चरणारविंद भक्तीवेदांत स्वामी श्रील प्रभुपाद यांची १२६ वी जयंती म्हणजेच व्यासपूजा महोत्सव साजरा करण्यात आहे. सकाळी ९ वाजता अभिषेक, शब्दांजली, पुष्पांजली आणि दुपारी १२.३० वाजता महाआरती व १.३० वाजता सर्वांसाठी महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे.
जन्माष्टमीच्या अनुषंगाने मंदिरात संपूर्ण दिवस हरिनाम संकीर्तन आयोजित केले आहे. भगवंतांचे विशेष शृंगार दर्शन, भगवंतांचा पाळणा, अध्यात्मिक प्रश्नोतरे, गोविंद महाप्रसाद, अध्यात्मिक ग्रंथ भांडार, पूजेचे साहित्य आणि प्रसाद असे आध्यात्मिक आकर्षण असेल. मंदिराच्यावतीने संपूर्ण सोलापुरातील नागरिकांना या जन्माष्टमीच्या सोहळ्यामध्ये भाग घेण्यासाठी मंदिराचे अध्यक्ष श्रीमान कृष्णभक्त प्रभू यांनी आमंत्रित केलेले आहे. कार्यक्रमाच्या अधिक माहिती आणि सेवेसाठी (२८२३९२००७२) किंवा (९३२६९८१५३३) या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. या पत्रकार परिषदेस पावन हरीनाम प्रभू, ब्रजबंधू प्रभू, आनंद वर्धन प्रभू, लिला पुरुषोत्तम दास आदी उपस्थित होते.