बँकेत पैसे कधी जमा होतील याची उत्सुकता

by kanya news ||

हनुमंत चौधरी/चिखली :   मोहोळ तालुका व चिखली परिसरात सध्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या पैशाचीच चर्चा सिरू असून, बॅंकामध्ये महिलांची मोठी गर्दी दिसून येत  आहे. नुकत्याच रक्षाबंधनाच्या अगोदर काही महिलांना या योजनेतील पैसे आल्याने उर्वरित महिलांना त्या पैशाची प्रतिक्षा लागली आहे. त्यामुळे मोहोळ तालुक्यातील राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये महिलांची गर्दी होत आहे.

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत आपले नाव आहे की नाही, पैसे जमा झाले की नाही, कागदपत्रांची पूर्तता झाली की नाही, हे पाहण्यासाठी बँकांमध्ये प्रचंड गर्दी होताना दिसत आहे. या गर्दीतून दिवसभर बँक अधिकाऱ्यांना तोंड काढता येईना झाले आहे. महिला आणि ग्राहकांच्या विविध प्रश्नांना तोंड देताना अक्षरशः त्यांच्या तोंडाला कोरड पडत आहे. मध्यप्रदेश पाठोपाठ राज्य शासनाने अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जाहीर केली. या योजनेतून प्रत्येक महिलेस दरमहा १५०० रुपये देण्याची हमी देण्यात आली. शासनाच्या घोषणेनंतर अनेक तर्कवितर्क निघाले व महिलांनी बँकांकडे धाव घेतली. तेव्हापासून बँका हाऊसफुल्ल आहेत. या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांनी बंद असलेली बँक खाती सुरू केली. काहींनी नवीन खाती सुरू केली. बँकांना ई-केवायसी करणे यासह खात्यांना आधार लिंक करण्यावर महिलांनी जोर दिला आहे. खाते तपासण्यासाठी बँकांमध्ये गर्दी झाल्यामुळे गेल्या दोन महिन्यांपासून बँकांत असलेली गर्दी अजूनही जैसे थे आहे.  रक्षाबंधनला ज्या महिलांना पैसे मिळाले आहेत. त्यांची खाते तपासणी करण्यासाठी पुन्हा बँकेत गर्दी होताना दिसत आहे.  ज्या महिलांना अद्याप पैसे आलेले नाहीत, त्या महिलाही बँकेत हेलपाटे मारत आहेत.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *