मठाधिपती शिवपुत्र महास्वामीजी यांची माहिती : २५ हजार भाविकांची राहणार उपस्थिती
By Kanya News||
सोलापूर : विमानतळ पाठीमागील कस्तुरबा नगर येथील श्री श्री श्री सद्गुरु बसवारूढ महास्वामीजी यांच्या मठात श्री श्री श्री सद्गुरु बसवारुढ महास्वामीजी मठ ट्रस्टतर्फे दि. २६ ऑगस्ट ते दि. १ सप्टेंबर दरम्यान अतिदुर्मिळ महाकल्याणकरी अशा “अतिरुद्र स्वाहाकार”चे आयोजन करण्यात आली आहे, अशी माहिती मठाचे संस्थापक श्रो. ब्र. श्री. ईश्वरानंद महास्वामीजी यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली. अतिरुद्र स्वाहाकार कार्यक्रमात सुमारे २५ हजार भाविक सहभागी होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
==============================================================================
- श्रावण कृष्णाष्टमीदिवशी २६ ऑगस्ट रोजी दिवसभर गो पूजन, ध्वज पूजन मंगलमंत्र पठण, महागणपती पूजन, स्वस्तिपुण्याह वाचन, मातृका पूजन, नांदी श्राद्ध, ऋत्विक वरण, प्रधानदेवता स्थापन, अग्निमंथन, अग्निस्थापना, कुंड संस्कार, नवग्रह होमम् होणार आहे. यानंतर अतिरुद्र स्वाहाकार आरंभ होणार आहे.
- यानंतर श्रावण कृ. नवमी २७ ऑगस्टपासून श्रावण कृ. त्रयोदशी दि. ३१ ऑगस्टपर्यंत दररोज सकाळी ७ ते दुपारी ३ वाजेपर्यंत मंगलमंत्र पठण, स्थापित देवता पूजा अभिषेक, लघुन्यास पठण करून अतिरूद्र स्वाहाकार करण्यात येणार आहे. श्रावण कृ. चतुर्दशी दि. १ सप्टेंबर रोजी अतिरुद्राची पूर्णाहुती होणार आहे. यात सकाळी ७ ते दुपारी १ वाजेपर्यंत मंगलमंत्र पठण, स्थापित देवता पूजा अभिषेक, लघुन्यास पठण, अतिरुद्र स्वाहाकार सांगता, मंडल देवता होमम्, बलिदान, महापूर्णाहुती, शिवास कर्मसमर्पण, विद्वत पुरोहित सत्कार हे विधी आणि कार्यक्रम होणार आहेत.
- दररोज सकाळी ७ वाजता रुद्राभिषेक, भस्मार्चन, बिल्वपत्रार्चन, हवन होणार आहे. सायंकाळी ६ वाजता शिवपुराण, प्रवचन, अष्टावधान सेवा मंत्रपुष्प, महामंगलारती होणार आहे. दररोज हजारो भाविकांना महाप्रसादाचे वितरण करण्यात येणार आले असल्याचेही मठाधिपती श्रो. ब्र. श्री. शिवपुत्र महास्वामीजी यांनी सांगितले.
==============================================================================
अतिरुद्र स्वाहाकारादरम्यान सात दिवसांमध्ये श्री अतिरुद्र मंत्राने अभिमंत्रित ११ हजार रुद्राक्षांचे भाविकांना वाटप, गोशाळा भूमिपूजन, मातृशक्ती पुरस्कार, आदर्श प्रशासकीय अधिकारी पुरस्कार, जीवनगौरव पुरस्कार, बसवज्योती पुरस्कार तर दि. ३०, ३१ ऑगस्ट आणि दि. १ सप्टेंबर रोजी धर्मसभादेखील होणार आहे. या अतिरुद्र स्वाहाकार आणि धार्मिक उपक्रमांमध्ये भाविकांनी सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी याप्रसंगी केले. या पत्रकार परिषदेस मठाचे मठाधिपती श्रो. ब्र. श्री. शिवपुत्र महास्वामीजी, मुंबई येथील उद्योजक सतीश कुलकर्णी आदी उपस्थित होते.
==========================================================================
ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर मंदिर ते मठापर्यंत निघणार मिरवणूक : अतिरुद्र स्वाहाकरनिमित्त ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर मंदिर ते मठापर्यंत सजविलेल्या रथातून मिरवणूक काढण्यात येणार आहे.
काय आहे अतिरुद्र : रुद्र हे शंकराचे एक स्त्रोत्र आहे. ते ११ वेळा म्हटले की एक एकादशनी होते. ११ एकादशनीचा १ लघुरुद्र, ११ लघुरुद्रांचा १ महारुद्र. असे ११ महारुद्र केले की १ अतिरुद्र होतो. रुद्राचा अविष्कार ऋग्वेदापासून आहे. ऋग्वेदात रुद्राचे एकूण ७५ उल्लेख आहेत. रुद्राचे एक स्वरूप भद्र म्हणजे कल्याणकारीही आहे. रुद्रसूक्त हे त्या भद्र रूपाला प्रसन्न करण्यासाठी आहे. रुद्र हा अग्नी स्वरूप तसेच जलस्वरूप आहे. तो पंचमहाभूतांचा अधिपती आहे, असे मठाधिपती श्रो. ब्र. श्री. शिवपुत्र महास्वामीजी म्हणाले.