अन्न व औषध विभागाकडून मोठी कारवाई
By Kanya News||
सोलापूर : बार्शी येथे अन्न व औषध विभागाने मोठी कारवाई करून ३५ गुटख्यांच्या पोतीसह सुमारे २६ लाख १२ हजार ८०० रुपयांचा गुत्ख्यासह अन्न पदार्थांचा साठा हस्तगत केला आहे. यावेळी प्रतिबंधित बादशहा गुटखा या प्रतिबंधित अन्न पदार्थाच्या ३५ पोतींसह दोन वाहन ताब्यात घेतले आहे.
दक्षता विभागाचे सह आयुक्त डॉ. राहुल खाडे यांच्याकडून प्राप्त गोपनीय माहितीच्या अनुषंगाने पुणे विभागातील विशेष भरारी पथकाचे सहायक आयुक्त देसाई यांना तत्काळ बार्शी येथे जाण्यास सांगण्यात आले. त्यानुसार देसाई हे सर्व अन्न सुरक्षा अधिकारी रेणुका पाटील, नंदिनी हिरेमठ व उमेश भुसे यांच्यासह बार्शी तालुक्यातील कोरफळे या ठिकाणी हजर झाले.
सदर ठिकाणी नेताजी तानाजी बरडे यांच्या घरासमोर उभ्या असलेल्या महिंद्रा पिकअप (वाहन क्रमांक एमएच-१२ एलटी-९८५३) व महिंद्रा पिकअप (वाहन क्र.-एम.एच. १३ एएन-३९५५) हे दोन्ही वाहने संशयरित्या थांबल्याचे सदर पथकास आढळून आले.
सदर पथकाने दोन्ही वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये बादशहा गुटखा या प्रतिबंधित अन्न पदार्थाचे एकूण ३५ पोती, किंमत रूपये १६ लाख १२ हजार ८०० रूपये तसेच महिंद्रा पिकअप (वाहन क्रमांक एमएच-१२ एलटी ९८५३) किंमत रूपये पाच लाख व महिंद्रा पिकअप (वाहन क्रमांक एमएच-१३ एएन-३९५५) किंमत रूपये पाच लाख असे एकूण एकत्रित किंमत रूपये २६ लाख १२ हजार ८०० चा मुद्देमाल आढळून आला. सदर प्रकरणी रेणुका पाटील, अन्न सुरक्षा अधिकारी यांनी पुढील कारवाईसाठी बार्शी तालुका पोलीस स्टेशन, बार्शी येथे फिर्याद दाखल करण्याचे कामकाज सुरु केले. उपरोक्त प्रतिबंधित अन्न पदार्थाच्या वाहतुकीसाठी वापरण्यात आलेले वाहन जप्त करुन ताब्यात घेण्यात आले आहे.