सोलापूर विचार मंचच्या मागणीला उपमुख्यमंत्र्यांकडून आला मेल : डॉ. संदीप आडके

By Kanya News||

सोलापूर: सोलापूरच्या होटगी रोड विमानतळावरील सर्व कामे पूर्ण होऊन दोन दिवसांपूर्वीच त्याच्या धावपट्टीची चाचणी यशस्वी झाल्याचे एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने सांगितले आहे. त्यानंतर सोलापूर विचार मंचच्या डॉ. संदीप आडके यांनी नागरी उडयन मंत्रालयाचे मंत्री किनीजारापू नायडू व मुरलीधर मोहोळ, चेअरमन एअरपोर्ट ऑफ इंडिया, डायरेक्ट जनरल डीजीसीए, जनरल मॅनेजर उडान व सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना दि. ३१ ऑगस्टपर्यंत सोलापूरची विमानसेवा सुरू करण्याबाबत मेल पाठवलेला होता. डॉ.आडके यांना जानेवारी महिन्यातच प्रधानमंत्री कार्यालयाकडून ही तारीख कळवण्यात आलेली होती. गृहमंत्री अमित शहा व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे या विमानतळाच्या देखरेखीसाठी पोलीस अथवा सीआयएसएफ यांचा सुद्धा बंदोबस्त करण्याची मागणी त्यांनी केली आहे. त्या अनुषंगाने   उपमुख्यमंत्री यांच्या कार्यालयातून सुजाता सौनिक, अप्पर मुख्य सचिव यांना योग्य कारवाईसाठी सूचना देण्यात आल्याचा ई-मेल डॉ. संदीप आडके यांना प्राप्त झालेला आहे.

गेल्या अनेक वर्षापासून सोलापूरची विमानसेवा खंडित झाल्यापासून सोलापूरचे किती नुकसान झाले याचा लेखाजोखाच डॉ संदीप आडके यांनी सर्व संबंधितांना कळविला आहे. त्यामुळे आता इथून पुढे तरी ही विमानसेवा सुरू होण्यास आणखी उशीर झाला तर आगामी निवडणुकीच्या काळात ही विमान सेवा सुरू होण्यास पुन्हा वेळ लागेल.  ऑगस्ट अखेरपर्यंत येथील उर्वरित कामे पूर्ण करून तातडीने विमान सेवा सुरू करावी. हा आग्रह सोलापूर विचार मंचतर्फे सातत्याने करण्यात आलेला होता. त्यास आता यश आलेले दिसत आहे.  सोलापूर जिल्ह्यातील सर्व उद्योजक, व्यापारी व नागरिकांनी अशा मागणीचा रेटा लावला तर नक्कीच ऑगस्टपर्यंत सोलापुरातून विमान उडेल व लँडसुद्धा होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

× Contact