चिखली परिसरात विद्युत मोटारी, केबल चोरीमुळे शेतकरी त्रस्त
By Kanya News ।।
चिखली : चिखली (ता.मोहोळ) परिसरातील अनेक भागात शेतातून विद्युत पंप, विद्युत मोटारी आणि केबल चोरून जाण्याचे प्रकार गेल्या काही महिन्यांपासून वाढले आहेत. त्यामुळे परिसरातील शेतकरी त्रस्त झाले आहेत.
गेल्या आठवड्यांत महेंद्र धर्मा सिरसट यांच्या शेतातील विहिरीवरून अज्ञात चोरट्यांनी विद्युत मोटार चोरून नेली. याबाबत मोहोळ पोलिसांकडे तक्रार अर्ज दिला आहे. गावातील इतर व्यक्तींशी संपर्क साधला असता अनेक शेतकऱ्यांनी आपल्या शेतातून केबल चोरीच्या घटना वारंवार होत असल्याचे सांगितले. अनेक छोट्या मोठ्या चोऱ्यांची तक्रार पोलिसांकडे केली जात नसली तरी शेतामधून शेती उपयोगी साहित्य चोरून नेण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत.
दरम्यान, छोट्या गोष्टीसाठी पोलिस ठाण्याची पायरी चढायला नको यामुळे शेतकरी तक्रार देत नाहीत. पण झालेल्या चोरीतून शेती कामाचा अडथळा होतो यावर संबंधितांनी योग्य ती दखल घेऊन चोरट्यांचा छडा लावावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.