मनू भाकरने जिंकले कांस्यपदक; पॅरिस ऑलिम्पिक : १० मीटर एअर पिस्तूलमध्ये ऐतिहासिक कामगिरी
पॅरिस : पॅरिस ऑलिम्पिक : २०२४ मध्ये भारतीय महिला नेमबाज मनू भाकर हिने भारताला कांस्यपदक मिळवून दिले. तिने महिलांच्या १० मीटर एअर पिस्तूलच्या अंतिम फेरीत चमकदार कामगिरी करत कांस्यपदक जिंकले. हे पदक आपल्या नावावर कोरत मनू भाकरने इतिहास रचला. नेमबाजीमध्ये पदक जिंकणारी ती पहिली भारतीय महिला नेमबाज ठरली आहे. थोडक्यात तिचे रौप्यपदक हुकल्याने तिला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले .
मनू भाकरची ही दुसरी ऑलिम्पिक आहे. याआधी तिने टोकियो ऑलिम्पिक :२०२० मध्ये पदार्पण केले होते. १०० मीटर एअर पिस्तुल फेरीत तिचे पिस्तुल तुटले होते. त्यामुळे गतवेळी ती पदकापासून वंचित राहिली होती. पण जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर तिने आज ऐतिहासिक कामगिरी करून दाखविली. भारताच्या २१ नेमबाज्यांच्या सदस्यांमध्ये मनू भाकर ही एकमेव अशी अॅथलीट आहे की, जिने अनेक वैयक्तिक स्पर्धांमध्ये सहभागी झाली आहे.
हरियाणातील झज्जर येथे मनू भाकर हिचा जन्म झाला असून, वयाच्या १४ व्या वर्षी तिने नेमबाजीमध्ये आपले करियर करण्याचा निर्णय घेतला.
गोल्ड कोस्ट २०१८ मध्ये महिलांच्या १० मीटर एअर पिस्तूल स्पर्धेत मनू भाकर कॉमनवेल्थ गेम्स चॅम्पियन आहे. ब्युनोस आयर्स २०१८ मधील युवा ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकणारी देशातील पहिली महिला खेळाडू आहे. गेल्या वर्षी आशियाई क्रीडा स्पर्धेत महिलांच्या २५ मीटर सांघिक पिस्तूलचे विजेतेपद पटकावले होते. आयएसएसएफ वर्ल्ड कप स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकणारी ती सर्वात तरूण भारतीय खेळाडू आहे. २०२३ च्या आशियाई नेमबाजी स्पर्धेत महिलांच्या २५ मीटर पिस्तूल प्रकारात ती पाचव्या स्थानावर होती. त्यामुळे भारतासाठी पॅरिस ऑलिम्पिकमध्ये तिने कोटा मिळवला होता.