शिक्षकांकडून होते राष्ट्रउभारणीचे कार्य
माजी प्राचार्य डॉ. चंद्रकांत चव्हाण यांचे प्रतिपादन
कन्या न्यूज सेवा: सोलापूर, दि. 1 ऑक्टोबर 2021-
राष्ट्राचा खरा आधारस्तंभ शिक्षक आहेत. राष्ट्रउभारणीचे कार्य शिक्षकांकडून होते, असे प्रतिपादन वालचंद कला व शास्त्र महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. चंद्रकांत चव्हाण यांनी केले. रोटरी क्लब ऑफ सोलापूर ईस्टतर्फे नेशन बिल्डर्स ॲवॉर्ड 10 शिक्षकांना मेसॅनिक हॉल येथे माजी प्राचार्य डॉ. चव्हाण यांच्या हस्ते देण्यात आला.
यावेळी रोटरी क्लब ऑफ सोलापूर ईस्टच्या अध्यक्षा सी.एस. बंडी, सचिवा रंजना शिरसट, क्लबचे पीडीजी प्राचार्य मोहन देशपांडे, असिस्टंट गर्व्हनर शिवाजी उपरे आदी उपस्थित होते. प्रारंभी प्राचार्य मोहन देशपांडे यांनी रोटरी क्लबच्या विविध उपक्रमांची माहिती देऊन नेशन बिल्डर्स ॲवॉर्डची संकल्पना सांगितली. पूर्ण जगभरात रोटरी क्लबतर्फे दिल्या जाणाऱ्या या पुरस्काराचा निकष सारखाच असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी अवधूत बोकडे (न्यू हायस्कूल, सलगरवाडी), मलेखा तांबोळी (शहीद कुर्बान हुसेन मुलींची मनपा उर्दू शाळा), श्रीनिवास गुजर (बापूजी प्राथमिक शाळा), नागरेखा बिंगी (कुचन प्रशाला), मल्लिकार्जुन मर्दे (श्री आंध्र भद्रावती माध्यमिक विद्यालय), नागनाथ येळम (अमर मराठी विद्यालय), आनंद सामल (मनपा मराठी मुलांची शाळा क्रमांक 6), सालेहाखातून शेख (मनपा उर्दू शाळा क्रमांक 2), जावेद काझी (जि.प. उर्दू प्राथमिक शाळा, पांगरी), हणमंतराव गुंदर्गी (जि. प. मराठी शाळा, सलगर) यांना पुरस्काराने माजी प्राचार्य डॉ. चव्हाण यांच्या हस्ते गौरविण्यात आले. शाल, श्रीफळ आणि सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप होते.
माजी प्राचार्य डॉ. चव्हाण म्हणाले, लोकसंख्येचे सर्वेक्षण, कोविडची कामे करत असताना माझा विद्यार्थी शिक्षणात मागे राहू नये म्हणून विद्यार्थ्यांना शिकवण्याचे कामही तितक्याच धडपडीने करणाऱ्या शिक्षकांचे कार्य खरोखरच कौतुकास्पद आहे. रोटरीने अशा शिक्षकांना शोधून त्यांना पुरस्कार देणे ही त्यांच्या कार्याची पावती आहे, असेही माजी प्राचार्य डॉ. चंद्रकांत चव्हाण म्हणाले.
रोटरी क्लब ऑफ सोलापूर ईस्टच्या अध्यक्षा सी.एस. बंडी यांनी सूत्रसंचालन तर सचिवा रंजना शिरसट यांनी आभारप्रदर्शन केले. यावेळी रोटरी क्लब ऑफ सोलापूर ईस्टचे अहमद शेख, सी.ए. लक्ष्मीनारायण शेराल, वैभव होमकर, कार्तिक चव्हाण, डॉ. संजय मंठाळे, पिडिजी व्यंकटेश मेतन आदी उपस्थित होते.