कन्या न्यूज सेवा: सोलापूर, दि. 1 ऑक्टोबर 2021-
सोलापूरच्या चार हुतात्म्यांवरील टपाल तिकिटाचे अनावरण शनिवार, दि. २ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ वाजता नियोजन भवन सभागृह येथे होणार आहे, अशी माहिती खासदार डॉ. जयसिध्देश्वर महास्वामीजी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
केंद्रीय दूरसंचार राज्यमंत्री देवूसिंह चौहान यांच्या हस्ते हा समारंभ होणार आहे. यावेळी माजी केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे, पालकमंत्री दत्तात्रय भरणे, जि. प. अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे, महापौर श्रीकांचना यन्नम, खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामीजी, खासदार रणजितसिंह नाईक – निंबाळकर, खासदार ओमप्रकाशराजे निंबाळकर यांच्यासह जिल्ह्यातील सर्व आमदार उपस्थित राहणार आहेत.
सोलापूरच्या चार हुतात्म्यांवर टपाल तिकिट काढण्याची मागणी गेल्या अनेक महिन्यांपासून होत होती. यासाठी खासदार डॉ. जयसिध्देश्वर महास्वामीजी, माजी सहकारमंत्री आमदार सुभाष देशमुख, परिवर्तन समूह बहुउद्देशीय संस्था, सोलापूर सोशल फाऊंडेशन यांच्यावतीने केंद्र शासनाकडे मागणी करण्यात येत होती. आमदार सुभाष देशमुख यांनी आणि खासदार डॉ. जयसिध्देश्वर महास्वामीजी यांनी दूरसंचार मंत्रालयात पाठपुरावा करून ही मागणी मान्य करून घेतली आहे. टपाल तिकिटासाठी लागणारे सर्व शासकीय पुरावे परिवर्तन समूह बहुउदेशीय संस्थेकडून केंद्र शासनाकडे सादर करण्यात आले.
या पत्रकार परिषदेस प्रवर डाक अधीक्षक वेंकटेशशवर रेड्डी, डॉ. सतीश वळसंगकर, प्रा. डॉ. नरेंद्र काटीकर, संस्थेच्या सचिवा अमृता अकलूजकर, शोभा बोल्ली, नंदकुमार अकलूजकर, जगदीश बिडकर आदी उपस्थित होते.