अध्यक्ष वरदराज बंग यांची माहिती : बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात
कन्या न्यूज सेवा: सोलापूर, दि. 01-01-2021
सोलापूर जनता सहकारी बँकेच्या एनपीएमध्ये मागीलवर्षीपेक्षा घट झाली असून, ऑपरेटिंग प्रॉफिटमध्ये वाढ झाली आहे. हे बँकेच्या प्रगतीचे लक्षण असून, यात आणखी चांगली कामगिरी आगामी वर्षात संचालक मंडळ करणार असल्याचे अध्यक्ष वरदराज बंग यांनी सांगितले. सोलापूर जनता सहकारी बँकेची ५६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा गुरूवारी (ता. ३० सप्टेंबर) खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.
शिवस्मारक सभागृहात कोरोना नियमांचे पालन करून ही सभा घेण्यात आली. प्रारंभी सभासदांनी बँकेच्या नूतन संचालक मंडळाचे स्वागत केले. यावेळी व्यासपीठावर सोलापूर जनता सहकारी बँकेचे अध्यक्ष वरदराज बंग, उपाध्यक्ष सी.ए. सुहास श्रीगोंदेकर, संचालक प्राचार्य गजानन धरणे, ॲड. प्रदीपसिंह राजपूत, मुकुंद कुलकर्णी, डॉ. किरण पाठक, दत्तात्रय कुलकर्णी, पुरुषोत्तम उडता, जगदीश भुतडा, चंद्रीका चौहान, रविंद्र साळे, आनंद कुलकर्णी, सी. ए. गिरीष बोरगांवकर, सुनिल पेंडसे तसेच प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी अंजली कुलकर्णी उपस्थित होत्या. प्रारंभी कोविड काळात निधन झालेल्या बँकेशी संबंधित आणि समाजातील विविध क्षेत्रांतील नागरिकांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यानंतर दिपप्रज्वलन आणि श्री लक्ष्मीच्या प्रतिमेचे पूजन करून वार्षिक सर्वसाधारण सभेला प्रारंभ करण्यात आला. यावेळी बँकेचे अध्यक्ष वरदराज बंग यांनी अहवाल वाचन केले. यानंतर प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी अंजली कुलकर्णी यांनी विषय पत्रिकेचे वाचन केले. वार्षिक सर्वसाधारण सभेत सभासदांसमोर ठेवण्यात आलेल्या विविध 12 विषयांना मंजुरी देण्यात आली. यावेळी सभासदांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना बँकेचे अध्यक्ष वरदराज बंग, उपाध्यक्ष सी.ए. सुहास श्रीगोंदेकर, संचालक प्राचार्य गजानन धरणे यांनी उत्तरे दिली. सूत्रसंचालन प्रेषिता चपळगांवकर यांनी केले. आभारप्रदर्शन सुहास श्रीगोंदेकर यांनी केले.
नूतन संचालक मंडळाचे काम समाधानकारक
सोलापूर जनता सहकारी बँकेच्या एनपीएमध्ये घट झाली असून ऑपरेटिंग प्रॉफिटमध्ये वाढ झाली आहे. २०२० मध्ये १४.८८ टक्के असलेला नेट एनपीए २०२१ मध्ये कमी होऊन ८.४७ टक्के झाला आहे. तसेच एनपीए कव्हरेज ५५ टक्के आहे. तर बँकेच्या ऑपरेटिंग प्रॉफिटमध्ये वाढ झाली असून २०२० मध्ये २३ कोटी ५१ लाख रुपये असलेला ऑपरेटिंग प्रॉफिट २०२१ मध्ये २८ कोटी ९१ लाख रुपयांपर्यंत वाढलेला आहे. त्याचबरोबर २०२० मध्ये ११.६२ टक्के असलेले बँकेचे भांडवल पर्याप्तता गुणोत्तर २०२१ मध्ये वाढून १२.४३ टक्के झाले आहे.
अशी माहिती अध्यक्ष वरदराज बंग यांनी यावेळी दिली. नूतन संचालक मंडळाचे काम समाधानकरक असून २०२२ च्या कामकाजात यात आणखी चांगली वाढ होईल, असा विश्वास सभासद डॉ. सतिश वळसंगकर यांनी यावेळी व्यक्त केला.
