लोकशाही दिनात केमच्या शेतकऱ्याची विनवणी प्रशासनाने केली मान्य

कन्या न्यूज सेवा ! सोलापूर,दि.: ९ फेब्रुवारी – माझं गाव जिल्ह्यापसनं लांब हाय…माजी जमीन पाझर तलावाच्या भूसंपादनात गेलीया…चुकीचं भूसंपादन झालंया…माज्या उताऱ्यावरनं शासनाचं नाव काढावं…मी अनेकदा अर्ज केला… मॅडम मी अपंग हाय…मला इथंवर येण होत न्हाय…मला कार्यवाहीचं उत्तर टपालानं पाठवा…हा प्रसंग आहे जिल्हाधिकारी कार्यालयातील लोकशाही दिनातला.

केम (ता. करमाळा) येथील शेतकरी ज्ञानदेव रामचंद्र देवकर यांनी मला प्रत्यक्ष येणे होत नसल्याने टपालाने माहिती दिली तरी चालेल, अशी विनंती केली. रोहयोच्या उपजिल्हाधिकारी चारूशिला देशमुख यांनी त्यांची अट मान्य करीत प्रशासनाला त्यांना त्वरित माहिती देण्यास सांगितले. 

आजच्या लोकशाही दिनात धर्माजी शिंदे यांचा एकमेव एक अर्ज होता. लोकशाही दिनासाठी आज 35 अर्ज दाखल झाले. संबंधित विभागांना अर्ज पाठविले असून यातील 10 जणांनी प्रत्यक्ष भेटून अर्ज दिले. भूमी अभिलेख, शौचालय, पोलीस स्टेशन याबाबच्या नागरिकांच्या समस्या होत्या. श्रीमती देशमुख यांनी संबंधित विभागांना अर्जांचा त्वरित निपटारा करून नागरिकांना न्याय मिळवून देण्याच्या सूचना केल्या. येत्या लोकशाही दिनापूर्वी सर्व अर्जदारांना उत्तर मिळायला हवे, असेही त्यांनी सांगितले. 

आपले सरकार पोर्टलवरील तक्रारीचाही निपटारा करा

अनेक विभागांच्या आपले सरकार पोर्टलवर तक्रारी प्रलंबित दाखवत आहे. प्रत्यक्षात कागदोपत्री तक्रारीचा निपटारा झाला असेल तरी पोर्टलवर ती माहिती भरावी, अशा सूचनाही श्री. देशमुख यांनी केल्या. आपले सरकार पोर्टलवर 21 दिवसांपेक्षा जास्त दिवस प्रलंबित तक्रारी राहता कामा नयेत, अशाही सूचना करण्यात आल्या.

यावेळी विविध विभागाकडे प्रलंबित असलेले माहिती अधिकार अर्ज, महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमची अंमलबजावणी आणि भ्रष्टाचार निर्मूलन समिती स्थापन केलेली माहिती याबाबतही आढावा घेण्यात आला.

यावेळी उत्पादन शुल्कचे अधीक्षक नितीन धार्मिक, सामान्य शाखेच्या तहसीलदार अंजली कुलकर्णी,  नायब तहसीलदार आर.व्ही.पुदाले यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

× Contact