पॅरोलवर आलेल्या आरोपीने केला तिसरा खून

वडापुरातील घटना

आरोपी अमोगसिद्ध पुजारीसोबत पोलीस पथक.

कन्या न्यूज सेवा! सोलापूर, दि. १९ऑक्टोबर २०२१-

पॅरोलवर सुटून आलेल्या आरोपीने चक्क तिसरा खून केल्याची घटना दक्षिण सोलापूर तालुक्यातील वडापूर येथे  सोमवारी घडली. कोयत्याने सपासप वार करुन खून केलेल्या आरोपीस २४ तासाच्या आत ग्रामसुरक्षा यंत्रणा आणि मंद्रुप पोलिसांनी वडापूर हद्दीत अटक केली.
अमोगसिद्ध भीमू पुजारी असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. ज्ञानदेव प्रभू नागणसूरे (वय- ५५ रा. वडापूर) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. मुलगा दत्तात्रय नागणसुरे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार मंद्रुप पोलिसात गुन्हा दाखल झाला.  मयत ज्ञानदेव नागणसूरे हे वडापूर- विंचूर रस्त्यावरील आपल्या शेतातील गवत आणण्यासाठी सायकलवरून गेले होते. त्यांच्या शेताजवळील तुळशीराम हक्के यांची शेती संशयित आरोपीने करण्यास घेतली आहे.

ज्ञानदेव नागणसूरे हे दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास सायकलवरून गवत घेऊन निघाले. रेवणसिद्ध पुजारी यांच्या वस्तीजवळ येताच पाठीमागून संशयित आरोपी अमोगसिद्ध पुजारी याने हातातील कोयत्याने त्यांच्यावर वार केले. त्यामुळे ते सायकलवरून खाली ऊसाच्या शेतात पडले. तेव्हा आरोपींनी त्यांच्या मानेवर डोक्यात तोंडावर सर्वत्र सपासप कोयत्याने वार केले.

गंभीर जखमा झाल्याने व रक्तस्राव होऊन ज्ञानदेव नागणसूर यांचा जागीच मृत्यू झाला. खून केल्यानंतर पुजारी हा घटनास्थळावरून पळून गेला. दत्तात्रय नागणसुरे याने फिर्यादीत दहा वर्षापूर्वी आरोपी पुजारी याने आपल्या पत्नीचे माझ्या वडिलांशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून पत्नीचा खून केला. शिक्षा भोगून जामिनावर आल्यानंतर याच संशयावरून त्याने माझ्या वडिलांचा खून केल्याची फिर्याद दिली होती.

दरम्यान,  जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी सूर्यकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मंद्रूप पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक डॉ. नितीन थेटे, पीएसआय अमितकुमार करपे, अल्लाबक्ष सय्यद, एएसआय लिगेवान, मुलाणी, हवलदार महिंद्रकर, श्रीकांत बुरजे, व्हनमाने, कोळी, काळे व वाघमारे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

ज्ञानदेव नागणसूरे या व्यक्तीचा त्याच गावात राहणारा व पॅरोल रजेवर आलेला आरोपी आमोगसिद्ध पुजारी याने धारदार शस्त्राने खून केल्याने गुन्हा दाखल झाला होता. त्या अनुषंगाने पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार आरोपीचा कालपासून वाडी वस्ती, आरोपीचे नातेवाईक, एस. टी. स्टँड येथे कसून  शोध घेत होते. मंगळवार॰, दि. १९ ऑक्टोबर रोजी आरोपी अंत्रोळी- विंचूर अंतर्गत रस्त्यावर आल्याची माहिती खब-याकडून मिळाली. सायंकाळी ४.५० वाजता मंद्रूप पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक अमित करपे यांनी ग्राम सुरक्षा यंत्रणेच्या टोल फ्री नंबर १८००२७०३६०  चा वापर करून अमोगसिद्ध पुजारी हा खुनातील आरोपी, अंत्रोळी- विंचूर या गावांमध्ये पायी चालत चालला आहे. सर्व गावकऱ्यांना ही माहिती दिली. तसेच अंत्रोळी गावच्या महिला सरपंच यांनी गावकऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या. सर्व गावकरी रस्त्यावर आले व खूनाच्या गुन्ह्यातील आरोपीला जेरबंद केले. ग्राम सुरक्षा यंत्रणेच्या तत्काळ व प्रभावी वापरामुळे व मंद्रुप पोलिसांच्या प्रयत्नाने खुनातील आरोपी जेरबंद होण्यास मदत झाल्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितिन थिटे यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

× Contact