कन्या न्यूज सेवा: सोलापूर दि. 30 ऑगस्ट 2021-
सोलापूरच्या मुले व मुलींच्या खो-खो संघाने राज्य अजिंक्यपद कुमार खो-खो स्पर्धेतील “ड” गटाचे विजेतेपद पटकावले.
कोविड नियमाचे पालन करून या स्पर्धा राज्यात विविध ठिकाणी सुरू आहेत. नेहरूनगर येथील शासकीय मैदानावर झालेल्या “ड” गटातील साखळी सामन्यात मुलांनी मुंबईला १७-१५ असे २ गुणांनी नमविले. कृष्णा बनसोडे, विकी कोळी व ज्योतीरादित्य गायकवाड यांच्या शानदार खेळीमुळे मध्यंतराची ८-६ अशी २ गुणाची आघाडींच सोलापूरला विजय मिळवून दिली.
मुलींच्या सामन्यात अमृता माने व संध्या सुरवसे यांच्या अष्टपैलू खेळीमुळे सोलापूरने अहमदनगरवर ११-९ असा १ डाव राखून २ गुणांनी दणदणीत विजय मिळविला.
न्यू सोलापूर क्लबने ही स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेचे उद्घाटन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुधीर खरटमल, महाराष्ट्र खो-खो संघटनेचे उपाध्यक्ष महेश गादेकर, नगरसेवक विनोद भोसले यांच्या प्रमुख उपस्थीतीत झाले. मुलींच्या सामन्यावेळी आमदार प्रणिती शिंदे यांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या. राज्य खो-खो संघटनेचे उपाध्यक्ष डॉ. प्रशांत इनामदार हे या स्पर्धेचे निरीक्षक होते.पारितोषिके शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार विजेते श्रीकांत ढेपे व न्यू सोलापूर क्लबचे अध्यक्ष मनोज संगावार यांच्या हस्ते देण्यात आली. यावेळी राज्य क्रीडा मार्गदर्शक सत्येन जाधव, जिल्हा खो खो असोसिएशनचे सचिव सुनील चव्हाण, उपाध्यक्ष रमेश बसाटे, न्यू सोलापूर क्लबचे उपाध्यक्ष संतोष कदम, सचिव प्रथमेश हिरापुरे, सहसचिव आनंद जगताप, युसुफ शेख, रवी मैनावाले, कृष्णा धुळराव आदी उपस्थित होते. सुरेश भोसले यांनी आभार मानले. गोकुळ कांबळे यांनी सूत्रसंचालन केले.

